ह्या वर्षी कोणत्या कलाकारांनी हजेरी लावली ते कळू शकेल का?
२००० च्या संमेलनाला हजर राहायचा योग आला होता. हल्ली सारखी रात्रीच्या कार्यक्रमांवर त्यावेळी बंदी नसल्यामुळे कार्यक्रम रात्रभर चालला.
शेवटच्या दिवशी उन्हं वर आल्यावर पं. भीमसेनजी गायला बसले. मला वाटतं नुकत्याच झालेल्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर प्रथमच असावं. त्यावेळेच्या त्यांनी गायलेल्या तोडीने अंगावर उभे राहिलेले रोमांच आणि डोळ्यात आणलेले अश्रू अजून स्मरणात आहेत. हा परिणाम हृदयात हात घालणाऱ्या गाण्याचा तर होताच, पण पंडितजी परत पूर्वीसारखे गाऊ लागले, ह्याबद्दलच्या आनंदाचाही होता.
एक वेगळी गमतीची आठवण - साधारणपणे ह्या कार्यक्रमाचं संपूर्ण निवेदन मराठीतून होतं. इतर भाषिकांची मोठी उपस्थिती असते म्हणून असेल कदाचित, पण एकदा हिंदी निवेदनाचा प्रयोग झाला. खास मुंबईहून आलेल्या हिंदी निवेदिकेने तीन दिवस केवळ हैदोस घातला. तिच्या 'अब पंडित भीमसेन जोशी प्रस्तुत करेंगे - तीर्त विटला' ने उपस्थितांच्या अंगावर ओरखडे उठले. अर्थात गाणं सुरू झाल्यावर त्यांची जागा पुन्हा रोमांचांनी घेतली हे सांगायला नकोच.
सवाई गंधर्व संमेलनामुळे अनेक नव्या-जुन्या, उदयोन्मुख-दिग्गज कलाकारांना ऐकायला मिळालं. बरेचसे नवोदित कलाकार नंतर पुढे आले, तर काही चांगले असूनही साजेशी प्रसिद्धी मिळवू शकले नाहीत.
खूप वर्षांपूर्वी १८-१९ च्या वयाच्या रशीद खानचं गाणं ऐकणं ह्याच कार्यक्रमामुळे शक्य झालं होतं. त्याने दाखविलेली चमक आणि तयारी हा त्या वर्षी मोठा चर्चेचा विषय होता.
शाळेत असताना रविवारी सकाळी जरा लवकर उठून रेणुका स्वरूप शाळेत घातलेल्या मांडवात (फुकट) शिरून पं. भीमसेन आणि त्यांच्या आधीच्या कलाकाराचं गाणं ऐकायला मिळायचं. नंतर व्यवस्थित तिकिट काढून तीन रात्री जागूनही कार्यक्रमाला हजर राहणंही बरीच वर्षं जमलं. मध्ये कधीतरी कार्यक्रमाचे स्थलांतर रमणबागेला झाले.
नवीन वेळापत्रकाप्रमाणे कार्यक्रम होऊ लागल्यानंतर मात्र अजून उपस्थित राहणं जमलं नाही. कदाचित पुढच्या वर्षी योग येईल...