जीजि, विचार करायला लावणारा प्रतिसाद. प्रथम तुम्हाला जाणवलेल्या नाटकीपणाविषयी. मृत्यूइतक्या गंभीर विषयावर लिहायचे म्हणजे भाषेचा फुलोरा जरा जास्तच फुलवावा लागेल, असे मला वाटले. विषयानुसार भाषेचा नूर बदलावा, असे माझे मत आहे. जी.ए. लिहितात, "आम्ही सामान्य माणसे बोलतो ते तोंडात डिंकाची बाटली घेतल्याप्रमाणे. एखादे नृत्य पहावे आणि ओरडावे, "सामान्य माणसे अशी कधी चालतात की काय?" त्यामुळे मृत्यूचे सौंदर्य दाखवण्याच्या प्रयत्नातली भाषा हा - कदाचित फसलेल्या- कलाकुसरीचा भाग आहे. जरा विचार केला तर त्यामागचा दृष्टीकोन दिसून येईल.
आयुष्य सुंदर आहेच, पण ते सुंदर होऊन संपण्यात त्या सौंदर्याचा उत्कर्षबिंदू आहे, असे माझे मत आहे. स्वादिष्ट बासुंदीची वाटी जर सतत भरलेलीच राहिली तर तिची गोडी ती काय? एखादा राजेशाही मालकंस जर संपतच नसेल तर तो तितका भरदार वाटेल काय? त्यामुळे संपूर्ण ऐहिक विचार जरी केला तरी रंगल्या मैफिलीनंतर हात उंचावून 'येतो रे...' म्हणत निघून जाणे हीच त्या मैफिलीची सर्वोत्कृष्ट फलश्रुती आहे, असे मला वाटते.
म्हणूनच सुंदर असे आयुष्य जर मृत्यूने संपते तर तो शेवट करणारा मृत्यू सुंदर कसा असेल? हे मला पटत नाही.
शेवटच्या परिच्छेदात मी मला मृत्यू कसा यावा याची माझी आदर्श कल्पना सांगितली आहे. म्हणूनच परिच्छेदाची सुरुवात 'मला वाटतं ते असं..' अशी आहे. हे अर्थातच व्यक्तिसापेक्ष आहे. इतरांना काय वाटेल हे मी कसे ठरवणार?
एवढ्या व्यापक आणि गहन विषयाकडे बघण्याचा हा आपला दृष्टीकोन आम्हाला अतिशय संकुचित वाटला.
याला मात्र आपण माझी लेखनमर्यादा समजावी.
चिकित्सक प्रतिसादाबद्दल आभार. कौतुक करणाऱ्या प्रतिसादांचे मोल आहेच, पण विष्लेषण करणारे प्रतिसादही तितकेच महत्त्वाचे. 'मनोगत' च्या ज्या वैशिष्ट्याबद्दक चित्तरंजन लिहितात, ते हेच.