लिखाळ,

मी कटाची आमटी कधीच केली नाही कारण अजिबात आवडत नाही. माझी आई करायची ते आठवून सांगण्याचा प्रयत्न करते.

पुरणासाठी डाळ शिजवताना थोडे जास्त पाणी घालून शिजव म्हणजे डाळ चांगली शिजली जाईल. डाळ शिजल्यावर एका चाळणीत/रोळीमध्ये ती २-३ तास निथळत ठेव. चाळणीच्या खाली एक पातेले ठेव म्हणजे डाळीमधले निथळलेले सर्व पाणी त्यात जमा होईल.

नंतर जेव्हा तू डाळ पुरणयंत्रातून वाटशील तेव्हा त्या पुरणयंत्रात/मिक्सर मध्ये पाणी घालून ते पाणी कटासाठी वापर. म्हणजे डाळ शिजवल्यावर निथळलेले पाणी व पुरणयंत्रातले पाणी हा झाला कट. या कटाच्या आमटीमधे तिखट, मीठ, काळा मसाला, चिंचेचे पाणी, चवीपुरता गूळ घालून शिवाय त्यात जिरे व सुके खोबरे भाजून व कुटून घालणे व कढीलिंब , लवंगा, दालचिनी, तमालपत्र याची वेगळी फोडणी करून ती या आमटीच्या वरून घालून चांगली उकळवणे.

पुरणपोळीसाठी टीप्स: डाळ शिजवताना जरूरीपेक्षा जास्त शिट्या करणे. पुरण शिजवताना साखर व गूळ १:१ घातले तर चवीला जास्त छान होते. साखरेची गोडी व गुळाचा खमंगपणा अशी दुहेरी चव येते.

पुरणपोळी पहिल्यांदाच करत असशील तर मात्र पूर्णपणे साखरेचीच कर कारण ती जास्त सोपी असते. अजून एक महत्त्वाची टीप पुरण शिजवल्यावर वाटण्यापेक्षा आधीच शिजलेली डाळ  वाटून मग त्यात साखर घालून शिजवले  तर पटकन होईल.

पुरणपोळीला व कटाच्या आमटीला शुभेच्छा.

रोहिणी