मराठी शुभेच्छा हा प्रकारच तसा नवीन आहे. त्या देण्याला आणि त्या कोणत्या प्रकारे द्याव्यात याची चर्चा व्हायला माझी कांहीच हरकत नाही.  आपण संक्रांतीला "तिळगूळ घ्या गोड बोला" म्हणतो किंवा दसऱ्याला "सोन्यासारखे रहा" असा संदेश किंवा आशीर्वाद देतो किंवा घेतो. यात एक प्रकारचा उपदेश म्हणा किंवा आदेश म्हणा, कांही तरी आज्ञार्थी असते. "तुमचे भले होऊ दे", "हा दिवस, हे वर्ष तुम्हाला सुखी ठरू दे"  अशा अर्थाची वाक्ये (शुभेच्छा, मंगल कामना वगैरे म्हणून) आपले आई वडील, बहीणभाऊ किंवा मुले मराठीत  आपल्याशी बोलू लागली तर कसे वाटेल? या गोष्टी अजून तरी इंग्रजीमध्ये ऐकायला बऱ्या वाटतात. मनोगतावरील चर्चेनंतर मराठीत शुभेच्छा देण्याचा पायंडा पडला तर तेही चांगले वाटू लागेल. मला तर असे वाटते की या निमित्ताने संवाद साधणे महत्त्वाचे आहे. शब्द कोठलेही असोत. त्यात शक्यतो शिकवण नसलेली बरी.