लिखाळ यांना,
वर उल्लेख केलेल्या पुस्तकाचे नाव 'तरीही येतो वास फुलांना' असे आहे. आधी चुकीचे दिले होते. तर थोडे या पुस्तकाविषयी. म. वा. धोंड यांनी मर्ढेकरांच्या जवळपास १२ ते १३ कवितांचे केलेले समीक्षण या पुस्तकात संग्रहीत केले आहे. इतरही काही कविता या समीक्षेच्या ओघात येतात. त्यांच्याही काही कडव्यांचे धोंड यांनी साम्यस्थळे वगैरे दाखवण्यासाठी रसग्रहण केले आहे. प्रत्येक कवितेसाठी साधारणपणे एक असे लेख आहेत. कविता कळण्यासाठी इतर बऱ्याच गोष्टींचीही माहिती करून घ्यावी लागते जसे कि कविता लिहीण्याचा काळ, त्यावेळची कवीची सामजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी इ. यावर धोंड यांचा विश्वास प्रत्येक समीक्षेतून दिसून येतो. याबद्दल पुस्तकाच्या मागे लिहिलेल्या ओळी इथे उतरवणे हे ज्यास्त संयुक्तिक ठरेल.
भावकविता ही काही विशिष्ट संदर्भातच रचली गेलेली असते आणि त्या संदर्भातच ती कृतार्थ होत असते. हे संदर्भ त्या कवितेवरूनच कळून येत नसले, तर अन्य मार्गांनी जाणून घ्यावे लागतात. ते नीट उमगले नाहीत, तर साहजिकच ती कविता दुर्बोध होते. मर्ढेकरांच्या कित्येक कवितांत याचा पुरा प्रत्यय येतो. मर्ढेकरांचा काळ आणि त्यांचे जीवन यांच्या संदर्भातच त्यातील प्रतिमा खुलूबोलू लागतात.
या पुस्तकाचा मुख्य उद्देश मर्ढेकरांच्या दुर्बोध कविता जाणून घेणे हा असल्याने मर्ढेकरी शैली, त्याचा मराठी काव्यावर झालेला परिणाम या प्रश्नांना धोंड थेट उत्तरे देत नाहीत. पण कवितेंबरोबर मर्ढेकर थोडेसे उलगडत जातात. मर्ढेकरांच्या नंतर आलेल्या कवींचा अभ्यास वरील प्रशांची उत्तरे शोधण्यात मदतगार ठरू शकेल.
हे सगळे इथे नमूद करण्याचा उद्देश हाच की मर्ढेकरांच्या काव्याशी माझा परिचय हा या पुस्तकापुरताच मर्यादित असल्याने याबाबतचे माझे ज्ञान हे मर्यादितच आहे. तसेच बाकी मर्ढेकरपूर्व आणि मर्ढेकरउत्तर कवींबद्दलही मला तितकीशी कल्पना नाही. या विषयावर चर्चा घडवून आणल्याबद्दल लिखाळ यांचे आभार. चर्चेतून नक्कीच या विषयाबद्दल अधिक माहिती मिळेल. मी या पुस्तकाच्या आधारे मर्ढेकरांबद्दल लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पुढच्या प्रतिसादात 'पिपांत मेले' बद्दल.
- ओंकार.
टीप: धोंड यांनी वापरलेल्या संदर्भात अग्रक्रमी 'मर्ढेकरांची कविता: स्वरूप आणि संदर्भ' या डॉ. विजया राजाध्यक्ष यांचा प्रबंध आहे. प्रबंधातील राजाध्यक्ष यांनी कवितांचे दिलेले स्पष्टीकरण धोंड यांनी खोडून काढले असले तरीही कदाचित लिखाळ यांच्या प्रश्नांची काही प्रमाणात उत्तरे देउ शकेल.