'तरीहि येतो..' वाचून बरेच दिवस झाल्याने व्यवस्थित काही आठवत नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा चाळून काढले. त्यातील खाली दिलेला उतारा लिखाळ यांच्या प्रश्नांवर थोडा प्रकाश टाकू शकेल.
पुस्तक : तरीहि येतो वास फुलांना.
पान क्रं. ११०.
काव्य, कादंबरी, संगीतिका, नाटक आणि समीक्षा अशा विविध प्रांतात मर्ढेकरांच्या प्रतिभेने संचार केलेला असला, तरी ती खरी रमली ती कविता आणि सौंदर्यशास्त्र या दोनच क्षेत्रांत. त्यांतील त्यांच्या कवितेची मनमुराद चेष्टा होऊनही मराठी कवितेने नवे मर्ढेकरी वळण मनापासून स्वीकारले होते. नवी कविता त्याच ढंगाने रचली जात होती. मर्ढेकरांची कविता अशी कृतार्थ झाली खरी, पण त्याच वेळी त्यांची स्वतःची कव्यनिर्मिती मंदावू लागली होती. मंदावण्याचे कारण मानसिक अस्वास्थ्य असावे. परंतु स्वतःची निर्मिती मंदावत असली तरी अन्य कवींच्या द्वारे मर्ढेकरी कविता बहरत आहे, हे पाहून ते कृतकृत्य झाले. 'सत्यकथे'च्या जुलै, १९५३ च्या अंकात त्यांच्या 'आला आषाढ-श्रावण'च्या बरोबरीने आलेल्या इंदिरा संतांची 'ऐकतील जर पिंपळपाने' आणि विंदा करंदीकरांची 'मनात घुमते शुभ्र कबुतर' या दोन कविता वाचून त्यांनी श्री. पु. भागवतांना उलट टपाली लिहिले :
....'सत्यकथे'च्या त्या अंकात इंदिराबाईंची आणि विंदा करंदीकरांची कविता माझ्या कवितेशेजारी छापून आपण नि: शब्द पण अचूक टीका केली आहे. इंदिराबाईंच्या आणि विंदांच्या कवितांनी माझ्या कवितेला खरोखर लाजविले आहे. यापुढे कविता लिहू नये असाच या दोन कवितांनी मल प्रेमाचा सल्ला दिला आहे जणू... ह्यात थोडंसं अहंकारी समाधानही आहे - सांगू का? मर्ढेकरांची प्रवृत्ती-शैली - ज्याला इंग्रजीत मर्ढेकरी idiom म्हणता येईल, अधिक सौदर्याने मराठी कविता आता मिरवीत आहे. अहंकाराचा दोष पत्करून - मर्ढेकर संपला. आता मर्ढेकरी युग आहे आणि मर्ढेकरांपेक्षा कितीतरी अधिक आकर्षक, कितीतरी अधिक मनोज्ञ!... त्यांच्या कवितेने मराठी नवीन कवितेचे पाऊल माझ्या तुटपुंज्या रचनेच्या कितीतरी पुढे जाईल अशी माझी अपेक्षा आहे. त्यांची दोघांची प्रतिभा उदंड नि उज्ज्वल बनावी. (२. ७. ५३)
वरील तीन कवितांतील मर्ढेकरांची कविता रूढ ओवी छंदात असावी, तर इंदिरा संत आणि विंदा करंदीकर या दोघांच्याही कविता मर्ढेकरांनीच नव्याने रूळवलेल्या पादाकुलक छंदात असाव्यात, हे लक्षणीय आहे.
लिहिता लिहिता आणखी एक विचार मनात आला तो हा की, 'पिपांत मेले' ही कविता १९४६ च्या दरम्यानची. मर्ढेकरांचा कालखंड लक्षात घेता ही कविता त्यांच्या सुरवातीच्या कवितांपैकी म्हणता येईल. त्यामुळे मर्ढेकरी पर्वाची सुरवात म्हणून या कवितांकडे पाहिले जात असावे. अर्थात हा माझा अंदाज.
कोणाला वर उल्लेखलेल्या इंदिरा संत व विंदांच्या कवितांबद्दल काही माहिती असल्यास इथे देता येईल का?
- ओंकार.
टीप: पुस्तकाच्या मागे राजहंस ची इतर प्रकाशने मध्ये हे मिळाले.
इंदिरा संत यांची कविता : एक आकलन
लेखिका: सुनीता जोशी.