दक्षिण मुंबईतील गिरगाव, मध्य मुंबईतील गिरणगाव, दादर, विलेपार्ले, गोरेगाव या मुंबईतील मराठी माणसाच्या परंपरागत वसाहती. आज परिस्थिती अशी आहे की, यापैकी एखादा अपवाद वगळता कुठेच मराठी माणूस बहुसंख्येने उरला नाही.

मला वाटते गिरणगावाची तुलना दादर, विलेपार्ले, गोरेगावाशी १००% होऊ शकत नाही. (या वाक्याचा कृपया विपर्यास करू नये.) गिरणगाव सोडता इतर ठिकाणी लोकांनी स्थलांतर केले ते केवळ कुटुंबे वाढल्याने त्यांना आपल्या राहत्या जागा अपुऱ्या पडू लागल्या म्हणून. दादर, विलेपार्ले, गोरेगाव येथे राहणारी बहुतांश कुटुंबे नोकरदार आणि उच्चशिक्षित आहेत हा ही लक्षात घेण्यासारखा मुद्दा. हे खरे की गोरेगावातील सरसकट लोक पार्ल्याला राहायला गेले नाहीत. पार्ल्यातील प्रभादेवी, वरळीला गेले नाहीत आणि दादरचे पेडर रोडला गेले नाहीत.( तरीही माझ्या पाहण्यात असे केलेली मोजकी का होईना पण सबळ उदाहरणे आहेत.) अर्थात ते पगारदार कुटुंबासाठी साहजिक नाही का? म्हणजे ज्याला गोरेगावांत राहणे परवडते, त्यापेक्षा मोठे घर हवे झाल्यास ते त्याला गोरेगावाच्या पलीकडेच परवडणे अधिक सयुक्तिक वाटते.

गिरगावातील चाळीत राहणाऱ्याचे किंवा गोरेगावांत फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एखाद्याचे जर इतरत्र मोठ्या घरात राहायचे स्वप्न पुरे होत असेल तर त्यात गैर काय? (माझ्या इमारतीतील दोन -तीन कुटुंबांनी आपली घरे विकून नाशिक-पुण्यात आलिशान बंगले बांधले.) उलटपक्षी आमच्या सख्ख्या शेजारी नोकरदार गुजराथी कुटुंबाला एक घर विकून बोरिवली भागात दोन फ्लॅट विकत घेता आले तर माझ्या कुटुंबातील मला, माझ्या भावाला, चुलत भावालाही गोरेगावातच राहत्या घरापेक्षा मोठ्या जागा घेता आल्या आणि अशी अनेक उदाहरणे नजरेत आहेत.

यासर्व प्रकारात कौटुंबिक कलह आणि लाखो रुपयांच्या मोहापेक्षा समाधानाने आणि मोकळिकीने नांदण्याचा प्रयत्न मला दिसतो.

मृणाल गोरेंचा प्रभाव संपला आणि गोरेगावातील सत्त्वशील मराठी संस्कृतीही हटली.

हे ही वाक्य अजिबात पटत नाही. प.बा. सामंतही गोरेगावात आहेत, कमल देसाईही आहेत आणि शिवसेनेचे गजानन किर्तीकर, सुभाष देसाई, सुनील प्रभू इ. ही गोरेगावातीलच आहेत आणि माझ्या जन्मापासून गोरेगावात राहणारी असंख्य कुटुंबेही तेथेच आहेत. मृणाल गोरेंचा प्रभाव संपल्याने गोरेगावातील सत्त्वशील मराठी संस्कृतीही हटली या वाक्याला काहीही आधार नाही.

एक मात्र खरे, मृणाल गोरे ज्या घरांत अनेक वर्षे राहिल्या ते घर एक लँडमार्क होते आणि ते जमीनदोस्त करून त्या जागी एक फुटकळ मॉल उभा राहणे खेदजनक आहे.

प्रियाली.