दिगम्भा आणि तात्यांसारख्या बुजुर्गांकडून "आगे बढो" मिळणे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. "मनोगता"चे हे एक वैशिष्ट्यच आहे की, नव्याचे येथे उचित स्वागत होते. (दिगम्भा , "बादे सबा" हा प्रयोग मोठा चपखल वापरलात तुम्ही. "बादे सबा , बिरहन को अति तरसाये" अशी एक नंद रागातील प्रसिद्ध चीज आहे !)
स्मरणरंजन आका नॉस्टाल्जिया हे एक मोठे नाजूक प्रकरण आहे. असे एक माणूस नसेल ज्याला गतकाळाच्या हुरहुरीचा, काहीतरी हरवल्याच्या भावनेचा स्पर्श झाला नसेल. परंतु, "जवळपणाचे झाले बंधन" या पाडगावकरी न्यायाने, स्मरणरंजनाच्या या रेशीमधाग्यांच्या बेड्या होऊ न देणे ही आपल्या भ्रमरवृत्तिची जबाबदारी आहे. गतकाळामध्ये बुडून जाताना, वर्तमानातील नवनवीन उन्मेषांकडे दुर्लक्ष होऊ न देणे हे देखिल तितकेच योग्य.
माझ्या जुजबी मराठी वाचनावरून सुद्धा मला असे दिसते की, मराठी साहित्यात सुद्धा नव्या दमाचे, जोमदार लिखाण होते आहे ; आणि ही निश्चित आशादायक बाब आहे. ज्यांच्या लिखाणाकडे मी डोळे लावून असतो त्यांपैकी काही नावे :
रमेश इंगळे उत्रादकर : हे गेली किमान १५ वर्षें कविता करीत आहेत. त्यांच्या कविता फार म्हणजे फारच सुरेख आहेत. यांची एक कादंबरी आली आहे. शीर्षक : "निशाणी : डावा अंगठा".
सलील वाघ : यांचा "तूर्तास" हा संग्रह प्रसिद्ध आहे. बंडखोर लिखाण. यांच्याबरोबरच वर्जेश सोलंकी, हेमंत दिवटे , मन्या जोशी (यांचा "ज्याम मन्या" नावाचा सांग्रह नुक्ताच प्रकाशित झाला) या "अभिधानंतर" या नियतकालिकाच्या सुभेदारांचा उल्लेख जरूर आहे.
सध्या येथे थांबतो.