कुणीसे म्हण्टले आहे, "नेचर इज एमॉरल". ए-मॉरल : जिथे वावदूक, जुजबी, वेव्हारी नैतिकतेचे नियम लागू होत नाहीत. जिथे सुक्याबरोबर ओलेही जळते. एका त्सुनामीमध्ये जिथे राजा, रंक, प्राणी, माणसे, झाडे कशाकशाचा पाड नसतो. जिथे गटाराच्या काठी गुलमोहर फुलतो ; आणि प्रसंगी बघता बघता , काळजी घेतलेले रोपटे मरून जाते. निसर्गातील विधि-घटना जश्या एका अज्ञात चक्राला बांधून झाल्यासारख्या आपण पाहतो; त्याप्रमाणे, लेखिकेच्या काही कथांतील पात्रे/घटना/प्रसंग माणसाच्या मूळ प्रवृत्तींचे दर्शन घडविणारे आहेत. कसोटीच्या प्रसंगी सामाजिक निती-नियमांऐवजी आपल्या आदिम प्रवृत्तींना धरून त्यांचे वागणे होते. आणि लेखिका हे लिहिताना "हे असे व्हायला हवे/नको" अशी भूमिका न घेता, "हे असे आहे" , इतकेच प्रभावीपणे मांडते.