माझ्या नजरेतून ही चर्चा सुटून गेली होती त्यामुळे प्रतिसाद देण्यास बराच उशीर झाला आहे.
वरच्या चर्चेतून मला जे कळले असे.
१. अदितींचे म्हणणे : माझ्या मते समृद्धता हा शब्द बरोबर नाही. मराठीत व्याकरणाचे नियम संस्कृतपेक्षा सैल आहेत अशी पळवाट यातून निश्चितपणे निघू शकते पण ती कोणी काढायचा प्रयत्न केल्यास समृद्धता हा प्रचलित शब्द नसून लेखकाच्या बुद्धीतून जन्माला आलेला नवीन शब्द आहे हे ध्वनित करून ठेवले म्हणजे बरे.हे पटले. तेव्हा समृद्धता हा नवीन शब्द मराठीत आला आहे असे धरून चालूया.
आता पुढील उदाहरणे पहा.
१. एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे भाषेच्या समृद्धीचे /समृद्धतेचे लक्षण आहे.
२. नवीन वर्ष आपणास सुखसमृद्धीचे/ सुखसमृद्धतेचे जावो.
मला ह्यातील पहिल्या वाक्यात समृद्धता तर दुसऱ्या वाक्यात समृद्धी हा शब्द कानाला चांगला वाटतो. शिवाय पहिल्या वाक्यात समृद्धपणाचे हे जास्त योग्य ठरेल असेही वाटते.
कोणत्या शब्दासोबत कोणता शब्द यावा याचे काही नियम नसले तरी संकेत असतात असं मला वाटतं. माझे एक स्नेही ह्या प्रकाराला 'शब्दमैत्री' म्हणतात. ही शब्दमैत्री विचारात घेऊन लेखन केलं तर त्याचं सौंदर्य वाढतं असं मला वाटतं. (इथेही सुंदरता कानाला चांगलं वाटणार नाही!)
आपल्याला काय वाटते?
(मनोगतावरच पूर्वी केव्हातरी तारुण्य आणि तरूणाई यांच्यातील साम्य/भेद यावर चर्चा झाली आहे. जिज्ञासूंनी पहावे.)