सूर्य पाहिलेला माणूस पाहिलेले नाही, भविष्यात पाहण्याची संधी मिळेल किंवा नाही हे सांगता येत नाही. सॉक्रेटिसचे तत्त्वज्ञान कळते असाही दावा करत नाही परंतु आपल्या लेखाच्या निमित्ताने सॉक्रेटिसची आठवण निघाली. सॉक्रेटिसबद्दल थोडेफार वाचन आहे त्यावरून हा प्रतिसाद.
सॉक्रेटिसने स्वत:ने आपले कोणतेही विचार किंवा तत्त्वज्ञान नमूद केले नाही किंवा ते ग्रंथ रुपाने लिहून ठेवले नाही कदाचित ते नष्ट झाले अथवा करण्यात आले. सॉक्रेटिस लोकांसमोर येतो तो ऍरिस्टोप्लेन, झेनोफोन व प्लेटोच्या ग्रंथांतून. त्यावरही बरेच ठिकाणी असा आक्षेप घेतला जातो की प्लेटोने स्वत:चेच विचार सॉक्रेटिसच्या नावावर मांडले असावेत.
सॉक्रेटिसबाबत बोलायचे झाले तर तो 'मॅन ऑफ काँट्रॅडिक्शन' म्हणून ओळखला जातो. त्याने प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उपस्थित केले. प्रत्येक गोष्टीची उलट बाजू पाहिली, नाण्यांच्या दोन्ही बाजूंवर विचार केला. मुखवट्यामागे दडलेल्यांना आणि पांघरूण ओढून झोपेचे सोंग आणणाऱ्यांना सत्य दिसत नाही. सत्य अनुभवण्यासाठी प्रश्न विचारावे लागतात. प्रत्येक मुद्दा उलट सुलट तपासावा लागतो. अथेन्सच्या तरुण पिढीला त्याने हेच शिकवले. यांत त्याने ग्रीक देवांना प्रसन्न ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या विधींवर प्रश्न उपस्थित केले आणि याच बरोबर अथेन्सच्या लोकशाहीच्या बुरख्याआडून चालणाऱ्या सत्तेबद्दलही अविश्वास दर्शवला.
सत्य जितके दाहक असते त्याहीपेक्षा त्याचा पाठपुरावा करणे, शोध घेणे आणि त्याला चिकटून राहणे अधिक दाहक असते. नुकतीच पाहण्यात (दूरदर्शनवर) आलेली एक गोष्ट सांगायची तर एके दिवशी सॉक्रेटिससमोर चाललेल्या एका विवादात अथेन्समधील एका वेश्येच्या सौंदर्याची व कमनीयतेची वाखाणणी केली गेली असता ती स्त्री अथेन्समधील सर्वात सुंदर वेश्या आहे हे मी तिच्याकडे गेल्यावरच मान्य करेन असे सॉक्रेटिसने ठामपणे सांगितले. अर्थात त्याच्या या आडमुठेपणामुळे त्याला लंपटपणापासून विक्षिप्त ते विदूषक अशा सर्व शेलक्या विशेषणांचा लाभ झाला.
अथेन्सच्या लोकशाहीबाबत सॉक्रेटिसचे आक्षेप जनमानसांत प्रसिद्ध होतेच पण याबरोबर स्पार्टाच्या हुकूमशाहीची तो मुक्तकंठाने स्तुती करे. पेलोपोनिशियाच्या तुंबळ युद्धात अथेन्सला स्पार्टाकडून मानावी लागलेली हार आणि त्यानंतर अथेन्सच्या डळमळीत झालेल्या साम्राज्यापासून त्यांना सामोऱ्या जाव्या लागलेल्या अनेक प्रश्नांमुळे राज्यात जरब बसविण्यासाठी कोणाला तरी बळीचा बकरा बनवणे आत्यंतिक गरजेचे होते. इतिहासात जीजसपासून, गॅलिलिओपर्यंत (आणि सद्दाम हुसैनपर्यंत) अशी अनेक उदाहरणे दिसतात.
देहदंडाची शिक्षा सुनावल्यावर सॉक्रेटिस त्याला धैर्याने सामोरा गेला. त्याच्या शिष्यगणाने त्याच्या सुटकेसाठी व्यवस्था केल्याचेही सांगितले जाते. परंतु सॉक्रेटिस स्वतःला अथेन्स किंवा ग्रीसचा नागरिक न मानता संपूर्ण जगाचा नागरिक मानत असे. पळून जाऊन पुढचे आयुष्य इतरांना काहीही न शिकवता अज्ञातवासात काढायची कल्पना त्याला मान्य नव्हती.
झांटिपीबद्दल बोलायचे झाले तर ती सॉक्रेटिसपेक्षा सुमारे ४० वर्षांनी लहान होते असे वाचनात येते. असे संसार सुखाचे नसतात अशी शक्यता बरेचदा मांडली जातेच. त्यातून इतर अथेन्सवासियांच्या मुलांना शिकवणाऱ्या सॉक्रेटिसने आपल्या तीन मुलांकडे दुर्लक्ष केल्याचेही वाचनात येते. तो शिकवण्याचा मोबदलाही मागत नसे यावरून परिस्थितीची कल्पना यावी. तुकारामांच्या पत्नीची व झांटिपीची परिस्थिती फारशी वेगळी नसावी असे वाटते.
असो. बराच मोठा प्रतिसाद झाला. सॉक्रेटिसच्या अनेक प्रसिद्ध वाक्यांपैकी एक सुरेख वाक्य द्यावेसे वाटते.
I am the wisest man alive, for I know one thing, and that is that I know nothing.
प्रियाली.