लिखाळ,
तुमचा प्रश्न विचारण्याचा उत्साह पाहून शेवटी शब्दकोश* हाती घेतलेलाच बरा असे ठरवले. आता विचारा काहीही.
उच्चाराचे सांगणे कठीण. पण बा'द (अरबी) मधील आ थोऽडासा दीर्घ असावा असे वाटते.
शब्दकोशात दिल्याप्रमाणे बाद (फ़ारसी) म्हणजे वात, वायु, हवा तसेच प्रत्यय म्हणून वापरल्यास होवो, राहो (ज़िन्दाबाद, मुर्दाबाद). पण बादएअंगूर इ. शब्दातला मूळ शब्द बाद नसून बाद: किंवा उच्चारानुसार बादा (म्हणजे दारू) असा आहे.
पुढे, बाद म्हणजे फक्त मंद झुळूक नसून कुठलाही वारा दिसतो आहे. कारण बादे तुंद किंवा बादे सर्सर म्हणजे झंझावात. आणि बादे ज़म् हरीर म्हणजे हिवाळ्यातली हातपाय गोठवणारी हवा. बादे बहारही असते व बादे ख़ज़ाँ सुद्धा असते.
बाद या शब्दातून व्यक्त होणाऱ्या आणखी एका छटेचा वाताच्या झटक्याशी संबंध आहे (पहा - बाद अंगेज़ म्ह. उन्मादजनक).
सबा म्हणजे सकाळी पूर्वेकडून येणारी थंड, मृदुल व मधुर हवा. म्हणजेच पुर्वा हे आता कोशात सापडले.
बाद चे इतर अर्थ मात्र आपण मराठी लोकांनी ईजाद केलेले असावेत.
उदा. आउट याअर्थी बाद हा आद्यमराठीक्रिकेटधावतेवर्णनकार बाळ ज. पंडित यांचा शोध असेल असे वाटते.
आणखी एक अर्थ - आमच्या कोल्लापुरी भाषेत बाद म्हणजे खराब, घाण. कपडे बाद झाले, वगैरे वगैरे.
असे विचित्र अर्थ का आले असावेत याबद्दल माझा अंदाज येथे पहा.
दिगम्भा
*(उर्दू - हिन्दी शब्दकोश, मुहम्मद मुस्तफ़ा खाँ "मद्दाह" यांचा, प्रकाशन: उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान, लखनऊ, तृतीय संस्करण १९७७)