श्री.विनायक यांचे दोन गैरसमज झाले असावे असे दिसते. त्यांचे अधिक स्पष्टीकरण खाली देत आहे.
प्रॉबेबिलिटीजच्या प्रत्येक गणितात गुणाकार होत नाही. जर अमुक आणि तमुक असेल तर तो होतो, जर अमुक किंवा तमुक असेल तर बेरीज होते, हे दाखवण्यासाठी मी गोळ्यांचे उदाहरण दिले होते. ते अधिक स्पष्ट करीत आहे. समजा आपण बरणीमधून तीन गोळ्या काढल्या तर त्यामधील प्रत्येक गोळी कोणच्या प्रकारची असू शकेल याच्या खाली दिल्याप्रमाणे एकंदर ८ शक्यता असतात.
१ आंबा..आंबा..आंबा
२ आंबा..आंबा..लेमन
३ आंबा..लेमन..आंबा
४ आंबा..लेमन..लेमन
५ लेमन..आंबा..आंबा
६ लेमन..आंबा..लेमन
७ लेमन..लेमन..आंबा
८ लेमन..लेमन..लेमन
आता यामधील शक्यता पाहू. प्रत्येक वेळी ती गोळी आंबा किंवा लेमन निघण्याची शक्यता ५० टक्के म्हणजेच १/२ इतकीच असते.
अ.पहिल्या दोन गोळ्या लेमनच्या निघण्याची शक्यता (अमुक आणि तमुक) १/२ X १/२ = १/४ (क्र.७ व ८)
आ.तीनही गोळ्या लेमनच्या निघण्याची शक्यता (अमुक आणि तमुक आणि तमुक) १/२ X १/२X १/२ = १/८ (क्र.८)
इ.तीनही गोळ्या लेमनच्या न निघण्याची शक्यता (अमुक आणि तमुक आणि तमुक) १/२ X १/२X १/२ = १/८ (क्र.१)
ई.पहिलीच गोळी लेमनची निघण्याची शक्यता = १/२
उ.पहिली न येता दुसरी गोळी लेमनची निघण्याची शक्यता (अमुक आणि तमुक) = १/२ X १/२ = १/४
ऊ.पहिल्या दोन्ही न येता तिसरी गोळी लेमनची निघण्याची शक्यता (अमुक आणि तमुक आणि तमुक) १/२ X १/२X १/२ = १/८
ए.तीन्हीपैकी कोणतीही एक गोळी लेमनची निघण्याची शक्यता (ई किंवा उ किंवा ऊ) १/२ + १/४ + १/८ = ७/८
तीस चाळीस माणसे घेतल्यास त्यातील प्रत्येकाची जन्मतारीख दुसऱ्या कोणाबरोबर तरी जुळायलाच पाहिजे असे मुळीच नाही. त्या सर्व लोकांपैकी एकाच तारखेला जन्मलेल्या कोणत्या तरी दोन व्यक्ती निघण्याची दाट शक्यता आहे असा संख्याशास्त्राचा निष्कर्ष आहे. आपण आपल्या ओळखीच्या प्रत्येकी चाळीस व्यक्तींचे वेगवेगळे गट केले, (उदा. एका वर्गातील, एका इमारतीत राहणारे, नातेवाईक, मित्रमंडळी इ.) व प्रत्येकाच्या जन्मतारखा त्यांच्या नावापुढे लिहिल्या तर त्यापैकी ९० टक्के गटांमध्ये एकच जन्मतारीख असलेल्या दोन व्यक्ती दिसतील. नेमकी आपलीच जन्मतारीख असणारी दुसरी व्यक्ति मिळण्यासाठी शेकडो इतर व्यक्तींच्या जन्मतारखा पहाव्या लागतील.
माझा डेटा बेस कदाचित मोठा असेल, पण माझीच जन्मतारीख असलेले नातेवाईक, रहिवासी तसेच राष्ट्रीय नेते मला माहीत आहेत.