जांभळ्या रंगाच्या वांग्याला आमच्या कोल्हापूर-सांगली या बाजूला मिळणाऱ्या हिरव्या वांग्यांची चव नाही. या हिरव्या वांग्यांना क्रुष्णाकाठची वांगी असे म्हणतात. त्यामुळे हिरव्या वांग्याच्या भाजीची मजा वेगळीच असते. अशा भरल्या वांग्याच्या भाजी सोबत गरम गरम ज्वारीची भाकरी. बस्स्स!! परदेशात फक्त आठवणी काढायच्या...
सहमत आहे. परदेशातच काय, पण इथे पुण्यातही अशी भाजी खायला मिळणे दुरापास्तच. गरम ज्वारीच्या भाकरीची फुगून पुरी झालेली असावी आणि ती टच्च्कन फोडली की त्यातून वाफ बाहेर यावी. सोबत शेंगदाण्याची चटणी आणि त्यावर म्हशीच्या सायीसकट दुधाचे कवडीदार दही असावे.पातीचा पांढरा कांदा असावा. एका छोट्या वाटीत कोल्हापुरी गूळ आणि त्यावर घातलेले साजूक तूप असावे, नाहीतर गुऱ्हाळातली ताजी काकवी असावी. हाताशी छोट्या काटेरी काकड्या - ज्यांना कोल्हापूर-सांगलीकडे 'वाळूक' म्हणतात - त्या असाव्यात, माठातले गार पाणी असावे....
जाऊ दे, महाशिवरात्रीला एवढे स्वप्नरंजन पुरे!