मी आत्ता जेव्हा बालकवींची ही कविता लिहायला घेतली तेव्हा मला राहून राहून माझ्या सरांची आठवण येत होती. ज्यांनी मला ही कविता शिकवली ते माझे अ. वा. कुलकर्णी सर हे मराठी साहित्य क्षेत्रातलं फ़ार मोठं नाव आहे. ते जेव्हा ही कविता शिकवत होते तेव्हा ते नेहेमी "असला औदुंबर " या शब्दाचा उच्चार फ़ारच वेगळा करायचे. त्या वेगळेपणाचा अर्थ माझ्या नंतर लक्षात आला. त्या "असला औदुंबर" या बालकवींनी वापरलेल्या शब्दाचा पुढे एवढा उहापोह होईल असे बालकवींना स्वप्नातदेखील वाटले नसेल. या कवितेचे नंतर म्हणजे बालकवींच्या मृत्युनंतर  तब्बल २८ अर्थ लावले गेले आहेत.

बालकवींना त्या "असल्या औदुंबर" या शद्वमधून नेमकं काय साधायचं होतं याचा मात्र थांगपत्ता लागलेला नाही. त्या शब्दाच्या मागे अनेकांनी आपली कल्पनाशक्त्ती लढवली आहे. कवितेचा मूळ विषय अगदी साधा आहे. वरवर पाहिले तर या कवितेत केवळ निसर्ग वर्णन आहे. पण त्या निसर्ग वर्णनात एक जिवंतपणा आहे. कवितेतल्या "असला औदुंबर" या शब्दांनी तो जिवंतपणा अधिकच गडद केलेला आहे. एकप्रकरची गूढता या कवितेमागे येते.

अशी ही बालकवींची कविता कुणाला बाल्याची, कुणाला शैशवाची, कुणाला कवित्वाची, कुणाला एखाद्या तत्त्वचिंतकाची तर कुणाला सिद्ध योग्याची आठवण करुन देते. आश्चर्य म्हणजे या कवितेचे जेवढे काही अर्थ निघाले ते सगळे या कवितेला लागू पडतात, अशी ही अनेकार्थसूचक कविता आहे. बालकवींनी ही कविता लिहून मराठीमधील समीक्षकांना नकळत आव्हान दिले हे मात्र खरे आहे.