'कांही न करणे' व 'स्वतःसाठी कांही न करणे' हे दोन स्वतंत्र प्रश्न आहेत असे मला वाटते. पहिले 'कांही न करणे' यात बहुधः अर्थार्जनासाठी कांही न करणे येते. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे ते ठरते. पांढरपेशा समाज सोडल्यास बहुतेक सगळ्या बायका अर्थार्जनासाठी काबाडकष्ट करतातच. तसेच कांही खुषालचेंडू पुरुषसुद्धा बसून पूर्वजांनी केलेली कमाई खात राहतात. तेंव्हा समाजाचा एक छोटा हिस्सा सोडल्यास या बाबतीत स्त्री पुरुष समानता आहे.
दुसरे 'स्वतःसाठी कांही न करणे' हे तर सर्वांसाठी लागू आहेच. नोकरी करणाऱ्या पुरुषांना स्वतःसाठी कांही करण्याची गरज नाही का? सेवानिवृत्त पुरुषांना ते लागू पडतेच ना?
चीनमधील प्राचीन काळात होऊन गेलेल्या तत्ववेत्त्यांनी या प्रश्नाचे समर्पक उत्तर देऊन ठेवले आहे. ते असे की तुम्हाला जर दोन पैसे मिळाले तर त्यातील एका पैशाची भाकरी घ्या व दुसऱ्या पैशाचे फूल. भाकरी तुम्हाला जगवेल तर कशासाठी जगायचे ते फुलाकडे पाहून समजेल. पैसे कमावणे हा जीवनाचा एक भाग झाला, पण एकंदरीतच जीवनासाठी आवश्यक गोष्टी करणे व स्वतःच्या आनंदासाठी कांही गोष्टी करणे याचा समतोल प्रत्येक माणसानेच राखणे महत्वाचे आहे असे मला वाटते.