फोडणीच्या भाताबरोबर खिचडीचाही उल्लेख राहून गेला. शिळा भात वाया जाऊ नये म्हणून खरे तर त्याला फोडणीची कलाकुसर करायची, पण नवरीपेक्षा करवलीचाच तोरा अधिक असावा असा हा फोडणीचा भात कधीकधी मूळ जेवणापेक्षा अधिक भाव खाऊन जातो. कढीलिंबाची तळून खुसखुशीत झालेली पाने, फुटाण्याची डाळ ( याला पंढरपुरी ‘डाळे’ असेही म्हणतात ) आणि शेंगदाणे याची फोडणी ,वरुन पेरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एखादी रसाळ लिंबाची फोड- बस्स! स्वर्गाचे द्वार किलकिले होते! रविवारी साडेआठ नऊच्या सुमाराला असा डिशभर फोडणीचा भात मिळावा, वर पाऊण कप दाट चहा मिळावा, ‘महाराष्ट्र टाईम्स’ ची पुरवणी वाचतावाचता मनावर सुखाचा तवंग पसरत जावा - असा एकच रविवार महिन्यात असला तरी पुरे!
खिचडीचा बाकी माहौल बनावा लागतो. धुवाँधार पाऊस असावा, चिंब भिजून घरी यावं, कोरडे कपडे घालून होईतो मुदपाकखान्यातून भाजलेल्या पापडांचा सुगंध दरवळावा, अल्युमिनियमच्या डेचकीत तांदूळ, तूरडाळ, मीठ, जिरे आणि हळद या पाचच जिनसातून साकारलेले वाफाळते अन्नब्रम्ह समोर यावे. सोबत गुजराथी कढी किंवा लसूण घालून केलेले अगदी पातळसर पिठले. लागल्यास मुरलेल्या आंब्याच्या लोणच्याची फोड घ्यावी किंवा कारळ्याची - जिला कोल्हापुरी भाषेत ‘कोरट्याची’ म्हणतात ती- किंवा ताज्या लसणाची चटणी! हात धुवून होताहोता डोळ्यांवर गुंगी यावी! असा पाऊस याद ठेऊन जातो!