वा वा राव काय लेख लिहिलाय ....
भोजनसमयीच हा लेख वाचून दुपारच्या भोजनात भात नसल्याची खंत अगदी उफाळून आली. मला गोड भात सोडल्यास भाताचे इतर सर्व प्रकार अगदी मनापासून आवडतात. त्यातला वरणभात हा म्हणजे मानाचा पहिला (कसबा) गणपतीच!
रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमाराला पोटात कावळ्यांनी पावसाळ्यातल्या बेडकांसारखा सूर लावल्यावर पांढराशुभ्र, आंबेमोहोराचा वाफाळता भात, त्यावर पिवळं धमक्क वरण, लिंबू, घरच्या साजूक तुपाची धार आणि चवीला कैरीच्या लोणच्याची फोड म्हणजे काय हे सुख अनुभवल्यावरच कळेल. वरणभाताशिवाय माझा रविवारच साजरा होऊ शकत नाही.
वरणभातापेक्षा काकणभर सरस असा भात म्हणजे भातात थोडी मुगाची डाळ आणि जास्त पाणी घालून केलेला भात. हा आजाऱ्यांसाठी पूर्णब्रह्म असतो. चव तर अशी लागते की जवाब नही! शिवाय त्यात तूप घालून जरा वेळ शेगडीवर ठेवला की त्यावर दुधावरच्या सायीसारखा जाड थर जमतो. असा भात कैरीच्या लोणच्याबरोबर खावा. पोटात शांतता, मनात शांतता आणि मूर्तिमंत तृप्ती असा तिहेरी वसा एकत्र मिळतो.
बाकी बिर्याणी (शाकाहारीच!) एकदा खाल्ली आहे. सर्वसाक्षींनि सांगितलेला उपाय एकदम आवडला मीही पक्की निरामिषवादी आहे पण हा उपाय नक्की करून बघणार.(कोणी मदतीसाठी इछुक असतील तर जरूर कळवावे!).
रामायणात म्हणे एक गोष्ट आहे की सीतामाईने बिचारीने हनुमंताला स्वतः स्वयंपाक करून जेवायला वाढले. पण अन्नाचे बुधलेच्या बुधले रिचवूनही त्याची भूक काही भागेना. तेंव्हा प्रभू रामचंद्राने तिला युक्ती सांगितली की रामाचं नाव घेऊन एक तुळशीचं पान त्याला वाढ. त्या एका पानाने हनुमंत तृप्त झाला. भाताचं पण काहीसं असंच आहे. भात म्हणजे रामाचं नाव घेऊन वाढलेलं तुळशीचं पान आहे आणि म्हणूनच त्याला इतका मान आहे. जेवणात भात नसेल तर काहीतरी अपुरं राहिलंय असं सतत वाटत राहतं. मग तो कुठलाही भात जरी असला तरी चालतो पण भाताला पर्याय असूच शकत नाही.
जाता जाता : पुलंच्या"भात संपूर्ण वर्ज्य करणं शक्य नव्हतं म्हणून पहिला आणि शेवटच भात ठेवून मधला भात फक्त बंद केला" या वाक्याची आठवण झाली. शिवाय खाजगीवाल्यांच्या त्या प्रसिद्ध साखरभाताचीही. आहाहा काय त्या पंगती, काय त्या वेळण्या, काय ते साखरभात...
जाऊ दे जास्त आठवणी काढत बसले तर आज काम होणार नाही... :)
इतका सुरेख लेख लिहिल्याबद्दल अनेकोनेक धन्यवाद....
--अदिती