मीराताई,
लेख आवडला, अल्पपरिचित विषयावर प्रकाश टाकलात.
आपला तो बाळासाहेब या न्यायाने आपली बहुधा अशी समजूत असते की मराठी ही अतिशय संस्कृतप्रचुर आहे किंवा सर्वात अधिक शुद्ध आहे व इतर भाषा काहीशा अधिक भ्रष्ट आहेत.
पण इतर भाषांशी थोडाही परिचय झाला की असे भ्रम नष्ट होऊ लागतात.
विशेषत: उडियाचा संस्कृतशी खूप प्राचीन व घनिष्ट संबंध असावा असे मला वाटते.
त्यांचे एक आडनाव "होता" असे आहे, हा तर यज्ञातला (आहुती देणारा) प्रमुख ऋत्विज. हे/असे नाव मी कुठल्याही अन्य भारतीय भाषेत ऐकलेले नाही.
याचप्रमाणे आमच्या कंपनीच्या एका बांधकामाची जागा "कमळांग" नावाच्या गावात होती.
स्पेलिंगवरून बेरहमपूर (आम्हाला वाटायचे की हा बेहरामपूरचा अपभ्रंश असावा) वाटणारे खरे तर ब्रह्मपूर आहे.
असा तिथल्या बहुतेक नावांत कुठेतरी प्राचीन संस्कृतीचा संदर्भ दिसल्यासारखा वाटतो. मीराताईंनी याहून अधिक सांगावे.
[आणखी एक गंमतः उडिया लिपी प्रथमदर्शनी एकदम अपरिचित, वेगळी वाटते पण प्रत्येक अक्षरामध्ये/वरून एक पागोटेसदृश आकार असते त्याच्या आत डोकावून पाहिले की आतला चेहरा (अक्षर) ओळखता येतो.]
व्हभयोरभेद:
बंगाली व तत्संबंधित भाषांमध्ये "व" आणि "ब" असे वेगळे उच्चार बहुधा नसतात. दोन्हींना "ब" च म्हणतात. याचाच एक उपसिद्धांत (करॉलरी) म्हणून इंग्रजी "v" या अक्षराला आपण जसे "व्ह" म्हणतो तसे बंगाली लोक "भ" म्हणतात (उदा. भेरिएबल, भॉल्यूम, इ.). आणि मग याचे बॅक-फ़ॉर्मेशन होऊन बंगाली नावांचे इंग्रजीत स्पेलिंग करताना मूळ "भ" चे "v" असे लिप्यंतर करतात. जसे अमिताभ ("ओमिताभो") इंग्रजीत "Amitava" होतो. शेवटी इतर भाषिक लोक ही पार्श्वभूमी माहीत नसल्यामुळे त्याचा अमितावा असा काहीतरी अडाणी उच्चार करतात.
म्हणूनच बहुधा मूळचा सौरभ गांगुली आता (सौरभ -> Saurav - >) सौरव अशा निरर्थक नावाने भारतभर ओळखला जातो.
मीराताईंनी दिलेले "बल्लभ"चे उदाहरण याच गोष्टीचे प्रत्यंतर देते.
एकूण स्वारस्यपूर्ण विषयाला हात घातला गेला. लगे रहो, मीराताई.
दिगम्भा