प्रिय जीजि,
मनमोकळ्या स्पष्ट प्रतिसादाबद्दल अनेक आभार.
मक्त्यातला तुम्हाला भरीचा वाटणारा 'च', हा ती ओळ "(च्यामारी - तात्याश्रींची आठवण झाली. असो) दैव पुन्हा माझ्या वाटेला आलेच !" अशा प्रकारे थोडीशी उद्विग्नता दाखवण्याच्या दृष्टीने अभिप्रेत आहे. ओळीच्या शेवटी उद्गारचिन्ह असते, तर कदाचित हे स्प्ष्ट झाले असते, असे वाटते.
कवडशांच्या अस्पष्टतेबद्दल आपल्याशी सहमत आहे. हा शेर आणखी स्पष्ट होईलही. 'तिच्या सावलीला मिठी मारलेल्या कवडशांमध्ये मी मला पाहिले होते', अशा अर्थाने पहायला गेले, तर शेराच्या खालच्या मिसऱ्यात ज़रा गडबड ज़ाणवते आहे नि त्यामुळे अर्थाच्या दृष्टीने अस्पष्टता आली आहे, हे खरे. पण त्याचवेळी 'तिच्या सावलीला मिठी मारलेल्या मला' मी कवडशांमध्ये पाहिले होते, असाही एक अर्थाचा पदर या शेराला आले. सावलीला मिठी मारणे हे सदैव त्या व्यक्तीमध्येच रममाण असल्याचे/गुंतल्याचे प्रतीक आहे. कवडसे हे त्या आठवणींचे द्योतक आहेत. मला स्वतःला ती व्यक्ती ही सखी/प्रेयसी या अर्थाने अपेक्षित असली, तरी तुम्ही म्हणताय, त्याप्रमाणे ती कदाचित आई, हरवलेली मैत्रीण/बहीण असे कोणीही असू शकेल. असो.
प्रतिसादाबद्दल पुन्हा आभार. तुमच्या या प्रतिसादाच्या निमित्ताने हे स्पष्टीकरण लिहिण्याची संधी मिळाली, ही समाधानकारक बाब वाटते.