अधिकाधिक वाचकांनी आपले लेखन वाचावे, यासाठी लेखाला असे झणझणीत शीर्षक देण्याची युक्ती आता नवीन राहिलेली नाही. तसेच अशी धोक्याची सूचना सुरुवातीलाच आणि ती सुद्धा ठळक लाल रंगात लिहिली, की लेखन वादग्रस्त होते व जास्तीत जास्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढते

हेच!!! म्हणून काहीतरी उफराटे शीर्षक शोधले. लेख छान आहे वाचून मस्त करमणूक झाली, परंतु या लेखाचे स्वानुभव असे वर्गीकरण करू नये असे म्हणणे मात्र पटत नाही, तसे केल्याने तू अर्ध्याअधिक प्रतिसादींना कटवतो आहेस.  (अर्थात ते कटतात का हा भाग वेगळा.) इतक्या "नाजूक विषयाला" हात घातल्यावर आपल्या मनातील मनोगत सांगायचे नाही की काय?  

आता समज की,

  1. रोझ मिल्कशेक आणि शँपेन ऐवजी मला वोडका-मार्टीनी हवी 'शेकन नॉट स्टर्ड' असे 'जेम्स बाँडच्या' आवेशात म्हणणारी बायको भेटली तर?
  2. किंवा मी बाजारातून मस्त बांगडे आणले आहेत ते पटकन साफ कर आणि तळून ठेव तोपर्यंत मी जरा ब्युटीपार्लरमध्ये जाऊन पेडीक्योर, मॅनिक्योर करून येते.
  3. "हे काय? तुला कित्तींदा पोळ्या लाटायला शिकवलं तरी अजून युरोपातल्या सर्व देशांचे नकाशेच लाटतोस," असा टोमणा देणारी बायको मिळाली तर?
  4. "वॉशिंगमशिन बिघडलंय, कपडे भिजवून ठेवले आहेत, ऑफिसातून लवकर घरी जा आणि धुवून ठेव, मला आज महत्त्वाची मिटींग आहे मी येऊ शकत नाही" असा फोन करणारी बायको मिळाली तर.
  5. प्रमोशन मिळाल्याच्या आनंदात तू तिला 'चल बाहेर जाऊन सिझलर्स खायला जाऊ आणि मस्त पार्टी करू' असे सांगशील आणि ती 'आज माझे गुरूवारचे व्रत आहे चणे आणि गूळ खाऊन राहायला पाहिजे' असे मख्ख चेहऱ्याने सांगेल तर.
  6. किंवा मी तुझ्याबरोबर क्रिकेटची नेहमी मॅच पाहते तेव्हा तू आजचा दिवस भारत पाकिस्तान लढत सोडून माझ्याबरोबर महालक्ष्मीच्या व्रताची कथा ऐकण्यास मंदिरात चल असे सांगणारी बायको मिळाली तर?

आता जगातील समस्त बायकांची क्षमा मागून, तुझ्या मामेबहिणीची (आणि माझ्या एकुलत्याएका नवऱ्याच्या एकुलत्या एका बायकोची [म्हणजे स्वतःचीच] )क्षमा मागून --

बायको कशीही मिळो, तुझ्या मामेबहिणीसारखी किंवा माधुरी दिक्षितसारखी, लग्नानंतर "कमाल" सात वर्षांनी (म्हणजे ते सेवन इयर इच वगैरे) तुझ्या हमखास लक्षात येईल की राक्षस आपल्या स्वजातीयांनाच पळवून नेत असतो.   (माणसांना पळवून नेत असता तर खाऊन टाकलं नसतं का?) आणि हे जेव्हा तुला पटेल तेव्हा एखाद्या राजपुत्रासारखा त्या बायकोला सोडवून आणण्याऐवजी काकुळतीने तू राक्षसाला म्हणशील,"घेऊन जा रे बाबा हिला आणि उपकार कर माझ्यावर की परत आणून सोडू नकोस (तसे होण्याची शक्यता जास्त असली तरीही) तुला खंडणी हवी असेल वर तर तीही देतो."

लग्नाचा लाडू खाऊन पाहण्यासाठी शुभेच्छा. मधुमेह काय नंतर सगळ्यांना होणारच आहे.

सर्वांनी ह. घ्या. पुन्हा एकदा, लेख आवडला.