(ते आरती प्रभू या नावाने कविता लिहायचे व चि. त्र्यं. खा. या नावाने गद्य. कविता हा माझा प्रांत नव्हे, म्हणून आरती प्रभूंच्या ऐवजी चिं.त्र्यं. खानोलकरांविषयी लिहितो आहे.)
चिं. त्र्यं. ना मराठी साहित्यातले कुमार गंधर्व म्हटले असते पण दारिद्र्यामुळे म्हणा, गांजणाऱ्या जीवनकलहामुळे वा दुसऱ्या कुठल्यातरी अज्ञात कारणामुळे त्यांच्या प्रतिभेला एक आदिम तडा पडला असावा. त्यामुळे त्यांच्या नाटककादंबऱ्या अत्यंत विचित्र, चमत्कारिक, अंगावर येणाऱ्या पण निर्दोष म्हणता येणार नाहीत अशा वाटायच्या. त्यांच्या सगळ्याच साहित्यात नीतिमत्तेच्या बंधनापलीकडच्या आदिम वासना, विकृती, वेड, मृत्यू, अनपेक्षित व अनियंत्रित असा नियतीचा खेळ हे दिसायचे. जीएंची नियती तर्ककठोर तर चिंत्र्यंची सगळ्या तर्कांच्या बाहेरची. कुठलीही कथा सरळही नव्हे आणि अपेक्षित कलाटणीयुक्तही नव्हे. प्रेमबीमसुद्धा असले तर कसला तरी पीळ पडलेले.
उगीच नाही प्रसिद्ध समीक्षक माधव मनोहर त्यांना एरॅटिक जीनीयस म्हणत.
मी वाचलेल्या त्यांच्या कादंबऱ्या -
१. रात्र काळी घागर काळी - लक्ष्मीचे शापित सौंदर्य ज्यापुढे कोणताही पुरुष लुळा पडे.
२. कोंडुरा - हा प्रपातही नि देवही. त्या देवाने दिलेल्या विचित्र व अशुभ वरदानामुळे सामान्य नायकाच्या जीवनाची झालेली परवड.
३. गणुराया आणि चानी - एकाच पुस्तकात दोन लघुकादंबऱ्या.
गणुराया (मला विशेष आवडलेली): लग्न /प्रेम करू पाहणाऱ्या, पण चहूबाजूंनी कौटुंबिक सामाजिक परिस्थितीने घेरल्यामुळे, स्वनिर्णय घेण्यास असमर्थ अशा मध्यमवर्गीय तरुणाची कथा.
चानी (म्हणजे खारोटी): इंग्रज सोजीराच्या क्षणिक वासनेचे अपत्य, साऱ्या गावाने वाळीत टाकलेली पण गावकऱ्यांच्या हिशेबी नजरांतून न सुटलेली निरागस पण (पुन्हा) शापित सुंदरी. बालनायकाच्या वेड्या वहिनीच्या ओव्या खास. (शांतारामांचा बहुधा पहिला मराठी चित्रपट, रंजनाचासुद्धा व मा. सुशांत रे चाही. हृदयनाथचे संगीत)
जयवंत दळवींच्या साहित्यातसुद्धा वेड, आत्महत्या, विकृती असायच्या पण ते माणसातले आपल्यापैकी वाटत. श्री. ना. पेंडसे तर सरळ सरळ माणसांमधले. चिंत्र्यं मात्र माणसातून उठलेले, नियतीने भलतीकडे खेचून नेलेले....