श्री जीएस,
आपण फारच रसभरीत वर्णन केलेत, पण लवकर का संपवले ते कळले नाही.
असो, दुसऱ्या दिवशी आम्ही पुर्ण गड पालथा घातला, रायगडाच्याच महाद्वाराचा धाकटा भाउ शोभावा असा एक महादरवाजा सुधागडाला आहे, या महादरवाज्याच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. याच महादरवाजातच आम्ही अजुन एक गोष्ट आमच्या निदर्शनास आली. तिकडे अनेक सापांनी सोडलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या कात बघायला मिळाल्या, त्या एवढ्या स्पष्ट दिसत होत्या की त्यावरील डोळ्याच्या खोबणी सुद्धा ओळखु येत होत्या. सुधागडावर फुरसे आणि घोणस अशा विषारी जातीच्या सापांचा सुळसुळाट असतो असे ऐकुन होतो, या कात बघुन त्यावर शिक्कामोर्तब केले. प्रत्यक्षात त्यातील एक जरी प्राणी नुसता समोर आला असता तर काय असा विचार करुन सुद्धा काटा येतो, सुदैवाने तसे काही झाले नाही.
सुधागडावरुन फिरतांना तेलबैला आणि धनगड यांचे मोहक दर्शन होते. त्याच बरोबर सरसगड सुद्धा सुंदर दिसत रहातो. सुधागडाचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे बोलते कडे, अर्थात इको पॉइंटस. आवाजाचा एवढा सुंदर प्रतिसाद मिळतो, की आपण आश्चर्य चकीत झाल्यावाजुन रहात नाही.
बऱ्याच दिवसापासुन कुठलाही ट्रेक झाला नव्हता, पावसाळ्यानंतर हिवाळा पुर्णपणे वाया गेला होता. त्यामुळे होळीला चंद्रग्रहणाच्या रात्री सुधागडाला ट्रेक करायचा आहे, हे ऐकुनच मन प्रसन्न झाले. शब्दात लिहिता येणार नाही एवढा आनंद या ट्रेकने दिला. दुरवर पसरलेल्या गावांमधुन दिसणारी होळी, स्वच्छ चंद्रप्रकाश. चंद्र तर एवढा मोहक दिसत होता की, कुणालाही कविता सुचावी. एवढे अप्रतिम दर्शन देणारा चंद्र डोळ्याचे पारणे फेडणारा होता. चंद्रग्रहणाचा दिड तास तर एक एक क्षण जपुन ठेवावा असाच होता. सर्वत्र पसरलेला प्रकाश, सुधागडावरील माळरान, सोबतीला गाई गुरांच्या हंबरण्याचा आवाज, मधुनच एखाद्या टिटवीनं ओरडुन जाणं, अशात हळुहळु चंद्रग्रहणाला सुरुवात, सपाट धरणीवर आडवे होउन आम्ही दुर्बिणीतुन त्या निसर्गाच्या चमत्काराचा आस्वाद घेतोय. आज लिहितांना सुद्धा अंगावर काटा येतोय, असे खुप कमी क्षण जगायला मिळतात. रोजच्या घाई गडबडीत आपण या सर्व स्वर्गीय गोष्टींना विसरुनच जातो, आणि अशा शांत वेळी निसर्गच आपल्याला हाताला धरुन त्याचा आस्वाद घ्यायला शिकवतो. संपुर्ण चंद्रग्रहण लागल्यावर, आकाश ताऱ्यांनी भरुन गेले होते. एरवी फार कमी वेळेला दिसणारे ताऱ्यांनी आभाळ गच्च भरले होते.
दिड दोन तास त्या मोहक वातावरणात काढल्याने ट्रेक सार्थ झाल्या सारखे वाटत होते, पण दुसऱा दिवस तर बोनस ठरला. सुंदर आणि प्रसन्न सकाळी, चवदार पोह्यांचा आस्वाद घययला मिळाला. त्यानंतर चोरदरवाजा ते महादरवाजा अशी गडाची सफर. त्यातच समोर आपल्या विशिष्ट आकारासहीत मस्त दर्शन देणारा तेलबैला आणि दुरवर पसरलेली सह्याद्रिची रांग. याच रांगेवरुन सह्याद्रीचे महाराष्ट्रभुमीवर किती विशाल छत्र आहे याची कल्पना येउन जाते आणि याच सह्याद्रिच्या कुशीत आपला जन्म झाल्याबद्दल अभिमानाने उर भरुन येतो, उन्हात डोळ्यांना सुखावणारी सुधागडावरची झाडे. सुधागडावरची झाडे फारच डौलदार आहेत, दोन्ही बाजुला प्रशस्त पसरलेली असतात. कडक उन्हातुन गेल्यानंतर अशी झाडे काय आनंद देत असतील हे अनुभवच सांगु शकेल. बोलत्या कडावरुन येणारा प्रतिध्वनी विचार करायला लावतोच. मग त्याच बोलत्याकड्यावरुन खड्या आवाजात गोब्राह्मण प्रतिपालक, प्रौढ प्रतापी पुरंदर, क्षत्रीकुलावतंस, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी जोरदार मारलेली आरोळी अजुनही कानात घुमत नसली तरच नवल. सुखाचे एवढे सगळे सोहळे एकत्र अनुभवुन आलो आणि पुढच्या अनेक दिवसांसाठी दैनंदिन व्यवहारातील संकटाना समोर जाण्याचे उंदड बळ मिळाले.
कुणालाही संधी मिळाल्यास कधीही सोडु नका असा हा ट्रेक.