हे अनुभवकथन इतकं गुंगवुन ठेवणारं आहे, की हे चालू झाल्यापासून रोज कधी एकदा मनोगतला जावून पुढील भाग वाचतो, असं होतं. आणि माझी खात्री आहे, बऱ्याच वाचकांची अशीच गत असणार. अरुणांना लेखन रंगवण्याची विलक्षण हातोटी आहे. परिसराची प्रदीर्घ आणि चोख वर्णने, व्यक्तिंची बहुतेक रास्त चित्रणे, प्रसंगांची सविस्तर मांडणी, हे सर्वच मुग्ध करणारे आहे.
पण, त्यांनी ज्या तऱ्हेने गोऱ्या अधिकाऱ्यांना रंगवले आहे, ते मला बरेच खटकले. एकतर, अरुण स्वतःच सांगून टाकतात की, ते गोरे अधिकारी काय बोलत होते, ते त्यांना समजतच नव्हते. पण तरिही 'त्याने लेक्चर झोडले' वगैरे टिकाटिपण्णी ते सहज करून जातात. दुसरी गोष्ट म्हणजे गोरे अधिकारी कधिही तासभर वगैरे बोलतांना मी तरी अनुभवलेले नाहीत. त्यांच्या कार्यपद्धतीत असे करणे बसतच नाही. कदाचित अरुणांचा अनुभव मझ्या सर्वस्वी उलटा असण्याची शक्यता आहे, हे मी मान्य करतो. पण मला वाटतं की आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगांना जास्त खुलवून सांगण्याकरता ते हे 'गोरा अधिकारी म्हणजे एकदम 'काळ्या रंगाचा' ' असे करत असावेत. खरं तर जेव्हा त्यांना शेवटी मुख्या कार्यलयात बोलवलं, तेव्हाच त्यांना केलेल्या चांगल्या कामामुळे कौतुक करून अजून कठीण जबाबदारी सोपवली जाणार, असं मला वाटू लागलं होतं. तो गोरा अधिकारी 'आता हे चांगलां केलंस, आता पुढील ही जबाबदारी आम्ही तुझ्यावर टाकीत आहोत' असं म्हणाला असण्याची शक्यता जास्त.
पठाणांकडून जिकीरीचं काम करून घेण्याबद्दल अरुणांनी जे कही भोगलं, तसेंच त्यांनी पठाणांना सहभागी करुन, जे काही साध्य करून घेतलं, तो सर्वच अनुभव इतका अस्सल व जीवघेणा होता, की गोऱ्या अधिकाऱांना उगाच काळं रंगवून वाचकांची सहानभूती मिळवण्याची जरूर का पडावी?
असो. जे वाटलं, ते लिहीलं. चांगल्या लिखाणात जो दोष मला वाटला, तो मी इथे मांडत आहे. चू. भू. द्या̱. घ्या.