अतिशय एकांगी गोष्ट, गोष्टीतील नायिका प्रमिला हीला आपल्या नवऱ्याचे श्रम दिसले नाहीत यावरून तिला कृतघ्न म्हणू, अशी उदाहरणे व्यवहारात सहज दिसतात परंतु तिच्या मैत्रिणी ( यःकश्चित पुरुषाने शिजवलेले कदान्न खायची वेळ??? सर्वच मैत्रिणी अशा विचांरांच्या निघाल्या? एकाच मुशीतून काढल्या होत्या की काय? ), नातेवाईक, सुमाताई, रेखावहिनी गोष्टीतील सर्वच बायका कृतघ्न?? आश्चर्याची गोष्ट वाटली. एखाद्याच्या घरात काय चालू आहे याचा अंदाज त्या घरातील व्यक्तींनी तोंड उघडून सांगितले किंवा नाही सांगितले तरी त्या घरात गेल्यावर सूज्ञांना नक्की येतो, तो अंदाज या मैत्रिणींना आलाच नाही म्हणजे सर्वच मूर्ख होत्या की काय?
खरे तर प्रमोदच्या घरी वापरात असलेल्या गॅस, कूकर, मिक्सर, ओव्हन, फ्रीज वगैरेमधली एकही वस्तू त्याच्या आईच्या स्वयंपाकघरात नव्हती हे प्रमिलाला चांगले ठाऊक होते.
हे वाक्य काय दर्शवते? की प्रमोदने आईच्या घरात हे सामान वापरले नव्हते पण बायको आजारी पडेपर्यंत स्वतःच्या घरातही वापरले नसावे. तसे असते तर हे वाक्य लिहिण्याची गरजच नव्हती.
माझा स्वतःचा अनुभव असा की पुरूष स्त्रियांच्या मानाने अधिक पद्धतशीर असतात. ते खरंच ओट्यावर सामान मांडून बिंडून ठेवतात आणि स्वयंपाक करतात, मला त्यांचे कौतुकही वाटते. बायका त्यामानाने व्यवस्थित नसतात असे अजीबात नाही पण त्यांना कोणती गोष्ट कोठे आहे ती काढायला, शोधायला किती वेळ लागेल याचा अंदाज असतो त्यामुळे त्या असल्या व्यवस्थिशीरपणाच्या भानगडीत पडत नाहीत.
यापुढे आपण गोष्टीत प्रमोदचा मोठेपणा दाखवला आहे जो स्पृहणीय असला तरी जेव्हा दोन शाळकरी मुलांची आई झोपून राहते त्यावेळेस केवळ स्वयंपाक अडत नाही तर कपड्यांची इस्त्री, धुतलेल्या कपड्यांच्या घड्या, घरातील इतर साफसफाई, शाळेचा अभ्यास, त्यांच्या परीक्षा, मुलांची इतर वेळची खाणी, त्यांची निगा - जसे मुलीचे केस विंचरून देणे, नखे कापली आहेत की नाही ते पाहणे, शाळेचे डबे सर्वच अडून राहते. नोकरी सांभाळून प्रमोद हे ही करत होता का? कदाचित असावा आणि इतकं जर तो करत असेल तर त्याच्या घरात येणाऱ्या एकाही व्यक्तीला ते नजरेस आले नाही, त्याचे अप्रूप वाटले नाही म्हणजे मोठे नवलच आहे.
आपण गोष्ट प्रमिलापुरती मर्यादित ठेवली असती तर पटली असती पण तसे न केल्याने गोष्ट फारशी आवडली नाही आणि पटलीही नाही.... 'एक होता राजपुत्र आणि एक होता राक्षस' अशी लहान मुलांना सांगण्याच्या परीकथांसारखी नाहीतर शुक्रवारच्या, गुरुवारच्या व्रताच्या कहाणीसारखी वाटली.