मला खालील गोष्टीकडे लक्ष वेधावेसे वाटते.

१. ही गोष्ट १५- २० वर्षापूर्वीची आहे. त्यातील पात्रे लहान गांवातील मध्यमवर्गीय कुटुंबामधून शहरात आलेली आहेत. मधल्या काळात घडलेला समाजाच्या विचारसरणीतील बदल मी पाहिलेला आहे व सुरुवातीसच तो नमूद केला आहे. आजच्या जगात व विशेषतः परदेशात गेलेल्या मुलींना ही गोष्ट कदाचित खरी वाटणार नाही, श्री. प्रभाकर पेठकर यांनाही ती कथा पटली नाही. पण ही एक सत्यकथा असेल तर पटली नाही असे म्हंटल्याने ती नाकारता येत नाही.

२. प्रमोदने घरातले काम करून कांही थोरपणा केला, किंवा पत्नीवर कांही उपकार केले  असा आव मी मुळीच आणलेला नाही. फक्त त्याने तत्कालीन परिस्थितीत रूढ नसलेला एक पर्याय निवडला होता व घरातील एक मोठा सदस्य या नात्याने आपली जबाबदारी पाळली होती एवढेच.

३. मी 'कृतघ्न' हा शब्द वापरलेला नाही. वर दिलेल्या कारणाने प्रमिलाला त्याचे कृतज्ञ रहाण्याचीही गरज नाही. त्याने केलेल्या घरकामाचे प्रमिलाला मनातून खूप कौतुक वाटत असेल व ते ती त्याला बोलून दाखवतही असेल. इतर स्त्रीवर्गासमोर मात्र ती त्या गोष्टीचा उल्लेख टाळते एवढेच मी दाखवले आहे.

४. घरात काय चालले आहे हे इतर स्त्रीवर्गाला (मैत्रिणींना) दिसत होतेच. फक्त एका पुरुषाने घरकामात केलेली लुडबुड त्यांच्या पचनी पडत नव्हती. स्त्रियांचे समजले जाणारे काम तो धडपणे करू शकणारच नाही अशी त्यांची पक्की खात्री होती म्हणून त्यांचा अविश्वास त्या प्रकट करीत होत्या. प्रमिलाबद्दल विनाकारण सहानुभूती दाखवत होत्या. जसा पुरुषांचा अहंकार (कु)प्रसिद्ध आहे, त्याच प्रकारची स्त्रियांची अहंभावना कदाचित त्यामागे असू शकते.

५."जेव्हा दोन शाळकरी मुलांची आई झोपून राहते त्यावेळेस केवळ स्वयंपाक अडत नाही तर कपड्यांची इस्त्री, धुतलेल्या कपड्यांच्या घड्या, घरातील इतर साफसफाई, शाळेचा अभ्यास, त्यांच्या परीक्षा, मुलांची इतर वेळची खाणी, त्यांची निगा - जसे मुलीचे केस विंचरून देणे, नखे कापली आहेत की नाही ते पाहणे, शाळेचे डबे सर्वच अडून राहते. नोकरी सांभाळून प्रमोद हे ही करत होता का?" असे एका प्रतिसादात लिहिले आहे.  माझ्या गोष्टीतील कुटुंबात मुलगी हे पात्रच नाही, तसेच प्रमोदने घरकामाकडे पूर्ण वेळ लक्ष देण्यासाठी ऑफीसमधून सुटी घेतलेली होती हे उघड आहे. "आता गरज संपली असे समजून त्याने ऑफीसला जायला सुरुवात केली होती." या माझ्या वाक्यावरून हे स्पष्ट होते.

६. "इतकं जर तो करत असेल तर त्याच्या घरात येणाऱ्या एकाही व्यक्तीला ते नजरेस आले नाही, त्याचे अप्रूप वाटले नाही"  असे मी कुठेच लिहिलेले नाही. त्या पाहुणे लोकांना घरातील परिस्थितीची पूर्ण कल्पना होती, सगळे कांही ठीक चाललेले आहे हा विश्वास होता, म्हणूनच ते आपली कामे करण्यासाठी निर्धास्तपणे बाहेर पडू शकत होते. त्यांनाही प्रमोदच्या कुटुंबाबद्दल प्रेम व काळजी होतीच. असल्या सगळ्या गोष्टी कथेच्या मर्यादेत लिहिता येत नाहीत. माझ्या गोष्टीमध्ये त्यांनी स्वतः कांहीच म्हंटलेले नाही. "प्रमोदने केलेले काम त्या पाहुणे लोकांनी निभावून नेले" असे गोष्टीच्या अखेरीस प्रमिला दुस-या स्त्री नातेवाईकांना सांगते. कदाचित या विषयावर जास्त चर्चा नको या विचाराने तिने असे सांगून तो विषय तिथेच संपवला असेल.

७."खरे तर प्रमोदच्या घरी वापरात असलेल्या गॅस, कूकर, मिक्सर, ओव्हन, फ्रीज वगैरेमधली एकही वस्तू त्याच्या आईच्या स्वयंपाकघरात नव्हती हे प्रमिलाला चांगले ठाऊक होते. हे वाक्य काय दर्शवते?" यावरून मला हे दर्शवायचे आहे की प्रमोद जे कांही काम प्रत्यक्षात करीत होता ते त्याला त्याच्या आईने शिकवलेले नव्हते. तरीही तिला (पर्यायाने एका स्त्रीला) ते श्रेय द्यावे असे प्रमिलाला वाटले. शिवाय हाताखाली मुलगी नसल्यामुळे नाइलाजाने ही विद्या तिला आपल्या मुलाला द्यावी लागली असे स्पष्टीकरण सुद्धा जोडावेसे वाटले.

८. कुणाला मनातून काय वाटत होते याचा वेध मी कथेमध्ये घेतलेलाच नाही. तसे दाखवणारे एकही वाक्य मी लिहिलेले नाही. 'घरकाम' या खास स्त्रियांच्या एकाधिकारावर एखाद्या पुरुषाकडून अगदी गरजेपोटी थोड्या दिवसांसाठी थोडेसे आक्रमण झाल्यावर त्यावर स्त्रीवर्गाच्या ज्या प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त झालेल्या मी पाहिल्या आहेत त्याच फक्त या गोष्टीत दाखवल्या आहेत. मनोरंजकता वाढवण्याच्या दृष्टीने मी ती थोड्या वेगळ्या शब्दात मांडली आहे.

९. माझी गोष्ट पुन्हा एकदा निःपक्षपाती नजरेने सावकाश वाचण्याची विनंती मी प्रियालीताईंना करतो.

१०.मृदुलाताईंचा प्रतिसाद सकारात्मक आहे व त्यांचे विवेचन पटते. त्यांना धन्यवाद.