१. १५-२० वर्षे म्हणजे १९८७-१९९२ ना मग फारसे मागे नको जायला तेव्हा कुटुंबे गावातून येत होती आताही येत असतील. येथे परदेशी जाण्याचा प्रश्न नाही, त्याकाळात मी स्वतः मुंबईतच असल्याने हे असले प्रकार निश्चितच पाहिले नव्हते. मुख्यत्वे इतरांच्या नवऱ्याला "य:किश्चित पुरूष" म्हणणे?? ही सत्यकथा असली तरी कथेची एक बाजू दिली आहे म्हणूनच मी तिला एकांगी म्हटले.
२. माफ करा. गेल्या ४० वर्षांपासून बायकांना मदत करणारे पुरूष, अगदी स्वयंपाकघरातही पाहिलेले आहेत आणि दरवेळेस बायका आपल्या नवऱ्याचे कौतुक करताना पाहिलेले आहे. परंतु परिस्थिती उलट असू शकते. माझ्या पहिल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे प्रमिला वाईट असू शकते पण सर्वच स्त्रिया मूर्ख आणि अप्पलपोट्या कशा?
३. आपण कृतघ्न शब्द वापरायची गरज नाही. एखाद्या मूर्ख माणसाला तू मूर्ख आहेस सांगायची गरज नसते, लोक त्याच्या पाठीवर त्याला हसतात किंवा कुत्सित नजरेने पाहतात तेव्हा त्याला मूर्खच समजत असतात. येथे मुले, घर आणि आजारी स्त्रीला सांभाळून नवरा जेव्हा इतकी सेवा करतो तेव्हा त्याची (कौतुक सोडा) दखलही न घेणे म्हणजे कृतघ्नपणा नाही काय?
४. येथे पुरूष घरकामात लुडबुड करत नव्हता. जेव्हा बाई काम करते आणि पुरूष येऊन अस्स कर तस्स करू नकोस किंवा माझी आई अस्स करायची सांगतो तेव्हा ती लुडबुड असते. येथे संपूर्ण स्वयंपाकघर प्रमोद सांभाळत होता. ४ थ्या मुद्द्यावरून या सर्व मैत्रिणी एकाच मुशीतून आल्या होत्या असेच वाटते.
५. मी ही प्रमिला असे म्हटले नाही. दोन शाळकरी मुलांची आई मग ती कोणीही असो. मुलांची वये माहित नाहीत परंतु बरेचदा त्यांचेही केस विंचरून द्यावे लागतात असा अनुभव आहे. प्रमोदने ऑफिसला जायला सुरूवात केली हे वाक्य फार खाली आले आहे... असो तो अर्धवेळ जात होता का, किंवा २-३ दिवस ऑफिसात जात होता का कि घरी बसून ऑफिसचे काम करत होता अशा काढायच्या म्हटल्यातर अनेक गोष्टी काढता येतील.
६. खरंय की कथेच्या मर्यादेत अनेक गोष्टी लिहिता येत नाहीत परंतु कथेतील प्रत्येक स्त्री पात्रासाठी आपण मूर्खपणा आणि अप्पलपोटेपणाचे रंग भरले आहेत. १५-२० वर्षांपूर्वी स्त्रियांना शरीरशास्त्र किंवा शल्यचिकित्सा माहित नव्हती??? यावर अधिक काय बोला? एकाही मैत्रिणीने किंवा नातेवाईकाने प्रमोदचे आभार मानले किंवा त्याच्याकडे कौतुकाने पाहिले असे क्षुल्लक वाक्यही गोष्टीत येत नाही.
७. मला वाटते १९८७ ते ९२ सालात असे होणे थोडे अवघड आहे, अशक्य नसावे. परंतु गोष्टीतील वाक्ये जसे "स्वयंपाकघरात जाऊन त्याने फडताळातले सगळे डबे उघडून पाहिले. विळी, खिसणी, चाळणी वगैरे कामाच्या गोष्टी कुठे आहेत ते बघून ठेवले." दर्शवतात की प्रमोदला स्वतःच्या घरातील गोष्टी कोठे आहेत हे माहित नव्हते. इतकेच नव्हे तर लग्नाला इतकी वर्षे उलटून गेल्यावरही त्या गोष्टी कोठे ठेवल्या आहेत हे तो तोंड उघडून बायकोला का विचारू शकला नाही? आजारी असली तरी डॉक्टर इस्पितळातून सोडतात तेव्हा रूग्ण बोलण्याच्या स्थितीत नक्कीच असतो त्यामुळे 'तोंड उघडून विळी ओट्याच्या खालच्या कपाटात आहे' असे सांगू तर शकली असती. तोंडाने ही भाजी अशी करा हे तर सांगू शकली असती. लोकांच्या घरात हे असं घडत असावं, अगदी १५-२० वर्षांपूर्वीही. असं नाही की, सुरेख चौकोनी कुटुंबात संवादच नाही. बायको झोपली आहे नवरा कपाटे शोधतो आहे आणि रूचिरा चाळतो आहे. हे करायलाही हरकत नाही परंतु प्रमिलाची अनास्था दाखवताना तिच्याबद्दल एखादे सरळ वाक्य टाकायला हरकत नव्हती असे वाटते.
८. प्रश्न प्रमिलापुरता मर्यादित असता तर काही आक्षेपच नव्हता परंतु सर्वच स्त्रियांचे असे चित्रण करण्यास लेखक म्हणून आपण मोकळे आहात, परंतु वाचक म्हणून मी माझे स्पष्ट मत मांडण्यास मोकळी आहे. घरकामात पुरूषांनी मदत केली तर स्त्रिया खूश होतात, लुडबुड केली तर वैतागतात हे ही खरे पण येथे लुडबुड नाही. येथे ८७ ते ९२ च्या दशकात लग्न झालेले अनेकजण असतील त्यातील एकाने किंवा एकीने सांगावे की आमच्या नवऱ्याने स्वयंपाकघरात मदत (लुडबुड नाही) केलेली आम्हाला/ बायकोला आवडत नाही. मी स्वतः यापैकीच एक आहे म्हणूनच गोष्ट मला अजीबात पटली नाही.
९. या गोष्टीत मी पहिल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे फक्त प्रमिला अशी असती तर प्रश्न नव्हता, ते पटण्यासारखे आहे अशी व्यक्ती सापडणे अवघडही नाही पण तिच्या सर्व अहंकारी एका मुशीतल्या मैत्रिणी, आजारी माणसाला मदत करायला येतो सांगून जीवाची मुंबई करायला आलेल्या नातेवाईक बायका आणि यांच्यात सापडलेला गरीब बिच्चारा प्रमोद या गोष्टीत नि:पक्षपातीपणा ठेवणे कसे जमायचे?
असो. यापेक्षा अधिक लिहायचे नाही कारण मला मूळ गोष्टीत बॅलन्सच दिसला नाही, तेव्हा हे येथेच संपवू.