माझी मित्रमंडळी मला 'अति'स्त्रीसमतावादी समजतात. प्रियालीताईंचे प्रतिसाद वाचून आपल्याला असे का वाटले नाही असा मोठाच प्रश्न मला पडला. कदाचित साताऱ्यासारख्या छोट्या गावात वाढल्यामुळे अशा प्रतिक्रिया देणाऱ्या स्त्रिया मी नेहमीच पाहिल्या आहेत म्हणून असावे. उदा. रोज आठाची वेळ गाठताना एका काकूंची धांदल होत असे. तर काका त्यांना भाजी चिरणे, कणीक भिजवणे असली मदत करत असत. माझे बाबाही अशी मदत करतात वगैरे माहित असूनही मी अचानक सकाळी सकाळी टपकले तर कणकेच्या हातवाल्या काकांना कुठे लपवू नि कुठे नको असे काकूंना होत असे. "आमच्या ह्यांना चहासुद्धा करता येत नाही", हे काकूवर्गाचे अभिमानाने सांगायचे वाक्य असे.

एका यःकश्चित पुरुषाने शिजवलेले कदान्न खायची वेळ आपल्या सखीवर आलेली पाहून त्यांची कोमल हृदये विदीर्ण होऊन जात व या अवस्थेतून तिची लवकरात लवकर मुक्तता व्हावी अशा शुभेच्या देऊन जाता जाता बल्लवाचार्य प्रमोदकडे एक जळजळीत दृष्टीक्षेप टाकून त्या घरी जात.

हे वाक्य अतिशयक्तिविनोदाचे असावे असे मला वाटले. (कदान्न, कोमल हृदये वगैरे..)

घरात काय चालले आहे हे इतर स्त्रीवर्गाला (मैत्रिणींना) दिसत होतेच. फक्त एका पुरुषाने घरकामात केलेली लुडबुड त्यांच्या पचनी पडत नव्हती. स्त्रियांचे समजले जाणारे काम तो धडपणे करू शकणारच नाही अशी त्यांची पक्की खात्री होती म्हणून त्यांचा अविश्वास त्या प्रकट करीत होत्या. प्रमिलाबद्दल विनाकारण सहानुभूती दाखवत होत्या. जसा पुरुषांचा अहंकार (कु)प्रसिद्ध आहे, त्याच प्रकारची स्त्रियांची अहंभावना कदाचित त्यामागे असू शकते.

माझ्या मते यात अहंभावना नाही तर पुरूषमाणूस घरकाम करतो आहे याची पोच देणे म्हणजे त्या पुरुषाला आणि त्याच्या पत्नीलाही अपमानास्पद होणार अश्या समजुतीतून या प्रतिक्रिया येत असाव्यात. प्रमिलाबद्दल सहानुभूतीही तिच्या नवऱ्याला हलकी कामे करायला लागत आहेत अश्या भावनेतून असावी. त्यातल्या त्यात सोपा मार्ग म्हणजे वस्तुस्थिती नाकारणे, असे लाजिरवाणे काही घडलेच नाही असे दाखवणे, तेच प्रमिला व प्रमोद शेवटी करतात.

माझ्या मते यात लाजिरवाणे काहीच नाही, तसेच अभिमानास्पदही काही नाही, हे आधीच नमूद करून ठेवलेले बरे. प्रमोदचे थोडक्या काळात सगळे शिकून घेणे, सांभाळणे कौतुकास्पद नक्कीच आहे. आणि तो आधी काही काम करत होता का, वगैरे प्रश्न गौण आहेत. कुटुंबासाठीची कोणती कामे कोणी करावीत हे ठरवणे हा ज्या त्या कुटुंबाचा प्रश्न आहे.