आबा ही जी.एंची एक विलक्षण दुखरी नस होती. 'अरभाट आणि चिल्लर' मध्ये ती जरा विस्ताराने प्रकट झाली आहे. पण त्याही अगोदर, तुतीसारख्या कथेंतून त्यांनी तिला जागवली आहे. त्याचप्रमाणे, रक्तचंदनच्या अर्पणपत्रिकेंत 'आबा....मी उठून, डोळे चोळून, नीट बसावयाच्या अगोदरच तुमची पाऊलें उंबरठ्याबाहेर पडली होती' असा उल्लेख आहे. अरभाटमध्ये आबांच्या आजाराचा सविस्तर उल्लेख आहे. असे हे आबा आजारी पडले आणि कुटुंबची परवड चालू झाली. मला वाटतं 'तुती'मध्ये त्या सर्व कठीण प्रसंगाचा उल्लेख आहे. हे आबा, तसेच वत्सल पण स्वाभिमानी आणि खंबीर अशी आई, व एक थोरली बहिण ह्यांनी जी.एंचं भावविश्व समृद्ध केलं. ही बहिण म्हणजे त्यांची सख्खी बहीण, जिचा कोल्हापूरला तिच्या सासरी अकाली मृत्यू झाला.
'माधव त्या चित्राने फार सुखावला व झपझप चालू लागला. शेजारी चालत असलेल्या जोडव्यांच्या चटचट आवाजाची त्याला विशेष ऐट वाटली.
हे असले या माणसाला कसे सुचत असेल?'
तातू सामंताप्रमाणेच जी.एंचही डोकं उघडून बघता आलं असतं तर अशा प्रश्नांची उत्तरं कदाचित मिळाली असती. पण कदाचित तेही खरं नव्हे!