आगाउपणाबद्दल क्षमा करा, पण इथे स्वप्न आणि महत्त्वाकांक्षा या मध्ये गल्लत होते आहे असे वाटते.

जे प्रत्यक्षात नसते पण जे असावेसे वाटते ते स्वप्न. जे शक्य नाही हे माहित असूनही त्याला दृश्यरुप प्राप्त व्हावेसे वाटते ते स्वप्न. ज्याला कसलीही कारणमिमांसा नसते, ज्याला का? कसे? कधी? कुठे? हे भौतिक मर्यादांनी बद्ध करणारे प्रश्न लागू नसतात ते स्वप्न. ज्यावर केवळ पाहणाऱ्याचा अधिकार असतो, बाह्य जगाचा सुतराम संबंध नसतो ते स्वप्न. जे काल व मिती च्या परिमाणात बद्ध नसते ते स्वप्न. स्वप्न हा आभास आहे. स्वप्न ही मनाची गरज आहे, स्वप्न ही तणावापसून तात्पुरती असली तरी मुक्ती आहे. स्वप्न ही कसलीही साधना न करता प्राप्त झालेली परकाया/ परलोक/ पररुप/ परस्रुष्टी प्रवेशसिद्धी आहे.

साहजीकच स्वप्नपूर्ती ही कल्पना आहे.

जे पूर्णत्वास जाते ते सुनियोजित ध्येय वा मह्त्त्वाकांक्षा असते. स्वप्न नसते.

म्हणताना कदाचित स्वप्न हा शब्द ध्येय वा महत्त्वाकांक्षा या अर्थाने वापरला जात असेलही, पण तरीही फरक हा निश्चित आहे. कदाचित अधिक वास्तववादी व दृढनिश्चयी माणसे आपल्या ध्येयाला वा महत्त्वाकांक्षेला जागेपणी 'स्वप्न' म्हणत असावीत!

साहित्य व समिक्षा यावर माझा अधिकार नाही,  हे केवळ माझे मत, त्याला विशेष किंमत नसावी. तरीही ते माझे मत आहे. स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व.