१. एका विशिष्ट कालमर्यादेत लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी निश्चित उपायांची अंमलबजावणी. खेडोपाडी जाऊन लोकांना संततिनियमनाचे उपाय, फायदे याविषयी माहिती देणे.
- ह्या बाबत सरकारने (मी कुठल्या विशीष्ठ पक्षाबद्दल बोलत नाही आहे !) केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत....
परंतु उत्तर प्रदेश, बिहार व इतर उत्तर भारतातल्या तसेच इशान्यपूर्व भारतातल्या राज्यांतून सकारात्मक प्रतिसाद मिळण्यास वेळ लागला. वेळ लागला हे अशा साठी लिहीले आहे- आधी १०/१२ पोरे निर्माण करण्याची हौस आता ४/५ वर आलेली आहे. 
हिंदू (होय हिंदूच !!!) वर्ग सोडल्यास फारसा उत्साहवर्धक प्रतिसाद इतर धर्मीयांनी दिला नसल्याचे स्पष्ट दिसते.  

२. एच. आय. व्ही. विषाणू कसा पसरतो, त्याला प्रतिबंध कसा करता येतो याविषयी जनजागृती, विशेषतः: शहरांमधील वेश्यावस्तींमध्ये.
ह्या बाबत बऱ्याच संस्थांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत व प्रयत्नांना पुरेसे यश येत असल्याचे दिसत आहे. परळच्या के.ई.एम. हॉस्पीटल मध्ये तसेच दिल्लीच्या एम्स मध्ये मी स्वत: काही अलायसा रिडर्स उपलब्ध (दान) करवून दिलेली आहेत. 

 एका विशिष्ट कालमर्यादेत देशात १०० % साक्षरता आणण्यासाठी उपाययोजना.
भारतातल्या दक्षीण व पश्चिम भागात तसेच पंजाब व उत्तरेच्या काही भागांत; मध्य प्रदेशात व काही प्रमाणात बंगाल मध्ये साक्षरता मोहिमा यशस्वी होत आहेत. लोक/जनजागृती करण्याचा सरकारचा बराचसा प्रयत्न यशस्वी होत आहे असे आकडेवारीवरून कळते. वाद घालायचा झाल्यास आकडेवारी व खरी साक्षरता असा घालता येईल परंतु आकडेवारी हे प्रमाण सध्यातरी नाकारता येणार नाही.

४. एका विशिष्ट कालमर्यादेत भारतातील सर्व गावांमध्ये पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, शहरांना जोडणारे पक्के रस्ते, दूरध्वनी, वाचनालये, आंतरजाल यासारख्या सोयी आणण्यासाठी उपाययोजना.
येथे सुधारण्यास भरपूर वाव आहे-
आपला स्वतःचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. पाणी वाचवण्यासाठी आपण स्वतः काय प्रयत्न करतो हेही आपण स्वतःचे स्वत:च पडताळून बघणे क्रमप्राप्त आहे.
माझ्या मते सर्वच बाबतीत आपण सरकारवर विसंबून किंवा दोषारोप करून मोकळे होतो व सरकार काय झोपा काढते का किंवा अमुक एक पक्षच कसा चांगला ह्याच्याच टिमक्या वाजवतो.
आपल्या पैकी किती जण आसपास होत असलेल्या अतिक्रमणांविरूद्ध महापालिकेकडे तक्रार करतात ?
आपल्या पैकी किती जण सार्वजनिक वाचनालये किंवा रस्त्यावर शेड बांधून तयार केलेल्या सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयांचा उपयोग करतात ?
रस्त्यांबाबत म्हणाल तर गावांकडचे रस्ते सुधारण्यास वाव आहे पण महामार्ग बऱ्यापैकी सुधारले आहेत- मुंबई-बंगळूर व मुंबई -अहमदाबाद व पुणे- हैदराबाद ह्या रस्त्यांवरून बऱ्याचदा ये जा केलेली आहे व त्यात खुप सुधारणा घडलेल्या आहेत. टोलमार्ग बांधल्याखेरीज ह्याबाबत अधिक सुधारणा होणे कठीण आहे. 
दुरध्वनींबाबत भारतात जी सुविधा उपलब्ध आहे - विश्वास ठेवा - ती अमेरिकेतही नाही ! गेल्या १० वर्षांत येथे दूरध्वनी व इंटरनेट (महाजाल) चा जो विकास झाला आहे तो स्पृहणीय आहे. येणाऱ्या दहा वर्षांबाबत तर कल्पनाही करवत नाही.
मनोगतावरील माझा हा प्रतिसाद कायम राहिल्यास - तो पांच सात वर्षांनंतर उघडून बघण्यास मला स्वतःला आवडेल !

५. विनासरकारी संस्थांना जी अनुदाने मिळतात त्यांची तपासणी करून बाबा आमटे, डॉ. बंग यांच्यासारख्या उपक्रमांना अनुदान, सवलती देणे.
एकाच प्रकारच्या संस्थाच काय ते फक्त चांगले काम करतात हा निकष सर्वमान्य होणे कठिण आहे हॅम्लेट.....
भारतात जोवर लोकशाही आहे तोवर आपण कुठलाच अट्टाहास धरू शकत नाही. 
माझे स्वत:चे मत मेघा पाटकर व अण्णा हजारेंबद्दल फारसे चांगले नाही पण म्हणून सर्वांनी तसेच मत करणे हा आग्रहही नाही.  

६. देशात नित्यनेमाने येणारे पूर, दुष्काळ याबाबत सकारात्मक दृष्टिकोनातून उपायांची अंमलबजावणी. उदा. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची होणारी अवस्था टाळण्यासाठी काय करता येईल?
एम एम आर डि ए च्या नव्याने केलेल्या सुधारणांचा कस जुलै मध्ये लागेल !

पण ह्या भागांत सुधारणांसाठी बराच वाव आहे. प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला "रेन वॉटर हार्वेस्टींग" प्रकल्प असल्याशिवाय परवानगी नाकारण्यात यावी. आमच्या गृहनिर्माण संस्थेने ह्यात बराच पुढाकार घेतला आहे व प्रकल्पाद्वारे संडासात वापरले जाणारे पाणी व गाड्या धुण्यासाठी तसेच बागेत घातले जाणारे पाणी पंपाने जमीनीतून (बोअरवेल मार्फत) मिळवले जाते.
ह्यामुळे पाणी वाया न जाता तसेच गटारांत जाऊन तुंबण्यास मदत करण्याऐवजी अडचणीच्या काळांत त्याचा वापर होतो.

माफ करा.... पण पंडित नेहरूंच्या काळापासून अटल बिहारी वाजपेयींनी नद्या जोडण्याचा प्रकल्प ठराव मांडला होता. निव्वळ तो विरोधी पक्षातल्या नेत्याने मांडला म्हणून आजवर बासनांत पडून आहे. सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प वाजपेयींनी राबवून घेतला व अर्ध्याहून अधिक पूर्ण केला म्हणून पुढे सरकत आहे !
 
७. देशातील शिक्षणपद्धतीचा फेरविचार. शाळेतील मुलांना विषयात गोडी वाटण्याच्या दृष्टीने उपाय. विद्यार्थ्यांना वेगळ्या वाटेने जाण्यासाठी विशेष सवलती, अनुदाने.
ह्या बाबत बोलावे तेव्हढे कमीच आहे. नुकत्याच पार पडत असलेल्या दहावीच्य इतिहासाच्या व मराठीच्या प्रश्नपत्रिकांतला गोंधळ टाळण्याचे उपाय आजवर शिक्षण तज्ञांना सापडू नये हे आश्चर्य आहे ! जुन्या चुका सुधारतांना नविन चुका करण्याची शिक्षण तज्ञांची खोड आता पालकांसाठी डोकेदुखी होत आहे.
जो पक्ष सत्तेवर येतो तो स्वतःच्या सोयीने शिक्षणक्रम/ अभ्यासक्रम बदलतो.
महाराष्ट्रातल्या शिक्षणमत्र्याने तर मध्यंतरी धमालच उडवून दिली होती - साहेब सध्या थंड आहेत पण कधी त्यांचे डोके सरकेल व आमच्या सारख्या पालकांना ती डोकेदुखी ठरेल हे कधीच सांगता येत नाही.
अनुदाने बंद होणार नाहीत हे आता ध्यान्यात घ्यावे. सर्वच पक्ष अनुदाने दामवटण्यामागून राजकारण खेळतात. ह्यात कमीत कमी वाढ होउ नये व खाजगी नोकरीतही आरक्षण पद्धती येऊ नये हीच इश्वरचरणी प्रार्थना ! 

८. देशातील उर्जासमस्येवर उपाय. सौरऊर्जा, अणुशक्ती यासारखे उर्जास्त्रोत कसे वापरता येतील?
सौर उर्जेवर हेवी लोड (उच्च दाब) चालवता येत नाही म्हणून घरगुती वापरासाठीच उपयोगी पडेल...
पण घरगुती वापरातही सौर उर्जेवर मर्यादा खुप आहेत- वातानुकील यंत्रे, मिक्सर, कपडे धुण्याची यंत्रे, शितकपाटे व पाण्याचे पंप चालवणे शक्यच नाही. उरला प्रश्न प्रकाश देणाऱ्या कांड्या (ट्युबलाईट) व पंख्यांचा- ह्या मर्यादित वापरासाठी ही अगडबंब यंत्रणा लावणार तरी कुठे ?
त्यापेक्षा प्रत्येक गृहनिर्माण संस्थेच्या गच्चीवर पवनचक्की मार्फत उर्जा निर्माण करणारी यंत्रणा उभारणे अनिवार्य करावे असे वाटते. ह्यामुळे कमीत कमी पाण्याचे पंप, उद्वाहने (लिफ्टस) व सार्वजनिक वापराची विज बचत होऊ शकेल असे वाटते. व सरकारी विज उद्योग धंद्यांसाठी वापरात येईल.
जाहिराती फलकांवर व मॉल्सना देण्यात येणारी अतिरीक्त विज ही खेड्यापाड्यांत दिल्यास तिकडचे जिवन सुखकर होईल.
रात्री चालणारे क्रिकेटचे सामने आवश्यक आहेत का ह्याचा विचार क्रिडाकारणी व राजकारणी सर्वेसर्वा शरद पवारांनीच करावा ! 

९. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दृष्टीने कडक उपायांची अंमलबजावणी.
हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा व आवश्यक आहे.
ह्याबाबत कुठलाही / एखादाही  पक्ष;  कुठलिही किंमत मोजण्यास तयार होईल अशी परिस्थिती सध्या नाही.


१०. देशातील जंगलांचा सफाया थांबवणे, शहरांमधील प्रदूषण आटोक्यात आणणे. संरक्षित प्राणी खरोखरच संरक्षित राहायला हवेत.
लोकशिक्षण व जनजागृतीने हे करता येण्यासारखे आहे. व मधल्या काळातल्या पेक्षा सद्य परिस्थिती बरीच चांगली आहे. पर्यावरणावर शिक्षणांत विषय आंतर्भुत करण्यात आलेला आहे हे ह्या बाबत चांगले लक्षण म्हणावे.

आपण ह्या मुद्यांवर येथे मनोगतावर लेख लिहून विचार करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल आभारी आहे !