अवलंबित्व हे शारीरिक व मानसिक अशा दोन्ही पातळीवर वेगवेगळ्या प्रकाराने असते. शारीरिक क्षमता निसर्गनियमानुसार वयाप्रमाणे आधी वाढत आणि नंतर घटत जाते. व्यायाम आहार आदि गोष्टी शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी कांही प्रमाणात उपयुक्त असतात. पण अनेक वेळा अनेक लोकांना अकस्मातपणे कुठल्यातरी रोगाने गाठलेले पहायला मिळते.
मानसिक अवलंबित्व हे बऱ्याच वेळा आत्मविश्वासाचा अभाव किंवा निव्वळ आळसापोटी येते. कधी कधी संस्कारसुद्धा माणसाला मानसिक रीत्या परावलंबी बनवतात. एका माझ्याहून वयाने ज्येष्ठ माणसाने एकदा "मला साधा चहासुद्धा करता येत नाही" असे फुशारकीने सांगितले. मी त्यांना नम्रपणे सांगितले की " जी गोष्ट एक अशिक्षित लहान मुलगी करू शकते ती करायला मला येत नाही असे सांगायला मला लाज वाटली असती." त्यांचा अहंकार अशा प्रकारे डिवचल्यानंतर त्याचा उपयोग झाला. पुढच्या वेळेस त्यांच्याकडे गेल्यावेळेस त्यांनी मला खायलासुद्धा करून दिले.
आम्हाला अशी शिकवण दिली गेली होती की घरातील प्रत्येक काम हे सर्वांचेच असते. हे काम पुरुषाचे, ते बाईचे, आणखी कुठले नोकराचे वगैरे घरातील कामाची वाटणी ही फक्त एक सोय असते. ती व्यक्ती हजर नसेल तर दुसऱ्या कुणीतरी ते आपणहून केले पाहिजे. त्याला ते करता आले पाहिजे. अशा प्रकारे आपल्यासाठी दुसरा करीत असलेले काम आपले मानणे ही मानसिक स्वावलंबित्वाची पहिली पायरी आहे असे मला वाटते.