पण ही एक सत्यकथा असेल तर पटली नाही असे म्हंटल्याने ती नाकारता येत नाही.
'सत्यकथा' पटली नाही म्हंटल्याने, 'असत्यकथा' होत नाही. एखाद्या कथेला लेखकाने 'सत्यकथा' म्हंटली म्हणून वाचकाने स्वतःच्या बुद्धीचा वापर करूच नये असे नाही. 'कथा नाकारताच येत नाही' ह्या प्रतिपादनात '(विचार न करता) स्वीकारलीच पाहिजे' असा दुराग्रह दिसून येतो. तो मला तरी चुकीचा वाटतो.
कथेमधील सर्व पात्रांनी अगदी प्रत्येक वाचकाच्या अनुभवविश्वातील लोकांसारखेच वर्तन करावे अशी सक्ती मी तरी कधी केली नाही.
सुसंगती आणि विसंगती ह्यावर विचार करून वाचक आपले मत प्रदर्शन करणारच. मनोगतावर कथा वाचकांसाठी खुली ठेवली आहे. आपल्या अनुभवविश्वाशी कथावस्तू पडताळून पाहण्याचा वाचकाचा जन्मसिद्ध हक्क कसा डावलता येईल? 'ते स्वातंत्र्य तुम्हांस नाही' असेच म्हणण्यासारखे हे आहे. आणि असे म्हणणे/समजणे अन्यायकारक आहे.
मी स्वतः स्वयंपाक मनापासून करतो. हौस म्हणून करतो. १९६९ साला पासून करतो. १९८४ साली माझे लग्न झाले. घरच्या अनेक पार्ट्यांमधून मी माझ्या पत्नीसमवेत स्वयंपाक केला आहे. सुरुवातीस माझ्या पत्नीस लाज वाटायची पण कालांतराने तिने ही सत्यपरिस्थिती स्वीकारली. माझ्या/तिच्या नातेवाईक/मित्रमैत्रिणींनी माझे/तिचे कौतुकच केले आहे. कथेत वर्णिलेल्या नायका इतके काय पण कणभरही कधी कोणी मला/मी शिजवलेल्या अन्नाला कमी लेखले नाही. त्यामुळे कथेतील वर्णन/वक्तव्ये/व्यक्तिचित्रणे मला 'पटली' नाहीत, रुचली नाहीत. त्यामुळे माझ्या प्रतिसादात 'कथा पटली नाही' असे म्हंटले आहे. कथा 'असत्य' आहे असे कुठेही म्हंटलेले नाही. आता एखाद्याचे 'सत्य' वागणे मला पटले नाही तर पटले नाही. ते 'पटले नाही' असे म्हणण्याचे माझे स्वातंत्र्य कोणी हिरावून घेऊ शकत नाही.
मला वाटते, लेखकाच्या म्हणण्यानुसार, ही सत्य घटनाही असेलही. पण अशी माणसं लाखात एक इतकी दुर्मिळ असावी. परंतु, लेखकाच्या लेखन पद्धतीतील दोषामुळे (लेखकाची मनापासून तशी इच्छा नसूनही) कथेतील स्त्री व्यक्तिचित्रणे 'अविचारी' 'अज्ञ' 'अहंकारी' अशा रंगात रंगविली गेली आहेत. अशा नकारात्मक स्वभाव विशेषांचा कथेत अंतर्भाव करताना एखाद्या घटनेच्या किंवा व्यक्तीच्या रूपात नकारात्मक वक्तव्यांचे/विचारांचे खंडन केले असते तर वाचकांच्या जरा पचनी पडले असते. पण तसे न केल्याने त्या नकारात्मक कोनाचेच समर्थन केल्यासारखे झाले आहे. असो.
ह्या कथेवरील सर्व स्पष्टीकरणे वाचून अजूनही असेच म्हणावेसे वाटते.........'कथा पटली नाही.'