हे संकेतस्थळ मराठीत आहे. त्यामुळे या संकेतस्थळा बद्दल आमच्या मनात प्रेम आहे, आपुलकी आहे, आदर आहे, अभिमान आहे, कृतज्ञतेची भावना आहे.
मराठी भाषा समृध्द आहे. शाळेत शिकविले होते, पिष्टमय पदार्थ खाताना त्यात लाळ मिसळून त्याची गोडी वाढते. असे पदार्थ जितके चावून चावून खावेत तेवढे ते जास्त गोड लागतात. तद्वत, मराठी भाषेचा बोलण्यात, वाचनात जेवढा वापर करावा तितकी त्याची गोडी वाढत जाते.
नुसता मराठीचा ध्यास घेवून भाषेची सेवा होणार नाही. तर भाषेच्या शुध्दतेचा ही ध्यास घ्यावा लागतो. इथे या 'मराठी' संकेत स्थळावर कांही जणं अशुध्द मराठी लिहीताना दिसतात. एक तर आळस, म्हणजे, 'आशय समजला नं.... मग झालं तर' अशी वृत्ती असावी किंवा मुळात भाषाच अशुध्द असावी. टंकलेखनाची अडचण सुरूवातीस असू शकते परंतु कालांतराने शुध्द टंकलेखनाची कला आत्मसात करण्यात अडचण येऊ नये. वेळ लागला तरी चालेल पण मी 'शुध्द मराठीच' लिहीणार असा ध्यास प्रत्येकाने धरावा, ही विनंती.