या चर्चेच्या निमित्ताने वरील विषयावर २५ मार्चच्या म. टा. मधील "ओपन हाऊस" या सदरासाठी मी पाठवलेला मजकूर खाली देत आहे.
राज ठाकरेंचे बिहारींबाबतचे विधान हे मराठी माणसांना समर्थांच्या 'खटासी असावे खट, उद्धटासी उद्धट' या वचनाची आठवण करून देणारे आहे. अगदी अलीकडे वाचनांत आले की एक कोर्टाचे न्यायाधीश भर कोर्टांत "भ्रष्टाचाऱ्यांना जाहीरपणे दिव्यांच्या खांबांवर फाशी दिली पाहिजे" असे म्हणाले होते. याचे कारण त्यांना परिस्थिति हाताबाहेर गेल्यासारखी वाटली असावी. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांना बिहारींच्या बाबतींत परिस्थिति हाताबाहेर गेल्यासारखी वाटली असावी म्हणून त्यांनी कानफटांत मारण्याच्या गोष्टी केल्या असाव्यात. त्या विधानामुळे देशभर उठलेल्या मोहोळाची फारशी पर्वा करण्याचे कारण नाही. मुंबई फक्त मराठी लोकांचीच आहे असे मराठी माणसांनी कधीच मानले नाही. याउलट, इतर राज्यांतील लोक किती कट्टर प्रांतीयवादी आहेत ते काही दिवसांपूर्वी सागर विद्यापीठावरून संसदेंत जो गोंधळ झाला त्यावरून दिसून आले. बिहारींना राज्याच्या मुख्य प्रवाहांत सामील करून घ्या असा साळसूद सल्ला मराठी माणसांना दिला जातो. त्यासाठी बिहारींनी पुढाकार घ्यायला नको का?
अर्थात मराठी माणसांच्याही काही गोष्टी चुकतात. पहिली गोष्ट म्हणजे मराठी माणसांच्या हिताची काळजी असणाऱ्या नेत्यांनी राणा भीमदेवी थाटाच्या गर्जना करणे सोडून द्यावे. बऱ्याच गोष्टी फारसा गाजावाजा न करता आपला संदेश लोकांपर्यंत पोचवण्याचे पर्यायी मार्ग शोधून साध्य करता येतील.
दुसरे म्हणजे परप्रांतीयांनी आपल्या राज्याच्या मुख्य प्रवाहांत सामील व्हावे असे वाटत असेल तर आपला मुख्य प्रवाह तेवढा जोरदार व वेगवान असला पाहिजे. नाहीतर इतर लहानसहान ओहोळ त्याला आपल्या दिशेने वळवतील. याचा अर्थ प्रत्येक मराठी माणसाने निर्धारपूर्वक प्रगतिपथावर मार्गक्रमण करीत राहिले पाहिजे.