मात्र आशारामबापूंची प्रवचने मी प्रत्यक्ष ऐकली आहेत. त्यांचा मुख्य भर हा कथाकथनात्मक आणि भक्तीरसतेवर असतो असे मला वाटते. पण त्यांच्यासमवेत नामस्मरण करण्याचा आनंद हा वेगळ्या पातळीवरचा असतो.प्रवचनांमध्ये अधून मधून आयुर्वेदाबद्दल सांगणे किंवा रोजच्या आजारपणावर घरगुती उपाय सांगणे हा त्यांचा स्वभाव आहे.
आशारामबापूंनी मान्यताप्राप्त वैद्यकीय प्रशिक्षण घेतले आहे काय? तसे नसल्यास असे सांगण्याचा त्यांना काय अधिकार आहे? तसे असल्यास या आक्षेपाकडे दुर्लक्ष करावे.

दुसरे म्हणजे मुरारीबापू- ज्यांनी रामनामाचा-रामकथेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शिक्षकीपेशातील नोकरी सोडून पूर्णवेळ रामकथा करण्यात आपले आयुष्य कारणी लावले. मी स्वतः त्यांच्या रामकथेचा आस्वाद घेतला आहे.
शिक्षकी पेशा सोडून रामकथा करणे हे आयुष्य कारणी लावणे आहे काय? जो माणूस लोकांना रामकथेचा 'आस्वाद' वगैरे देतो, तो नक्कीच एक चांगला शिक्षक असला पाहिजे. मग त्याने रामकथा करणे म्हणजे आयुष्य 'कारणी ' लावणे - पर्यायाने शिक्षकी करणे म्हणजे आयुष्य कारणी न लावणे- असे आहे काय?
नामात दंग झालेल्या त्यांना मी पाहिले आणि "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" हे आठवल्यानंतर आणि प्रत्यक्ष प्रचिती घेतल्यानंतर मी त्यांच्या पायांवर डोके ठेऊ लागलो.
'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे इतरांना सांगणारा माणूस इतरांना आपल्या पायावर डोके कसे ठेऊ देतो? गाडगे महाराजांना कुणी पायावर डोके ठेवायला आला की महाराज आपल्या हातातल्या झाडणीने त्याला फटका देत. एकीकडे 'हे ईश्वरा ,सगळ्यांना चांगली बुद्धी दे.... आणि तुझे गोड नाव सदा मुखी राहू दे' असे भक्त आणि ईश्वर यांच्यात डायरेक्ट कनेक्शन जोडून द्यायचे आणि दुसरीकडे भक्तांना 'दर्शन' द्यायचे, हा दुटप्पीपणा नाही काय?
त्यांनी स्वतः:ची नोकरी, कुटुंब सांभाळून सुरू केलेला हरिनामाचा प्रचार "ज्ञानेशांचा संदेश" या ग्रंथरूपाने प्रकाशित होण्यासाठी त्यांच्याच साधकवर्गाने, जो त्याकाळी मुंबईतील गिरणीकामगार होता, आपल्या पगारातून, प्रॉविडंड फंडातून पैसे काढून मदत केली.
हे तर अनाकलनीय आहे. गिरणी कामगाराची आर्थिक हलाखी आपण जाणतो. त्यांच्या पगारातून, फंडातून पैसे घेउन, मग ते अगदी स्वखुषीने का असेना, केलेला एखादा उपक्रम असा पवित्र वगैरे कसा असू शकतो? एखाद्या गिरणी कामगाराच्या शाळकरी मुलीला, जिच्या ट्रीपचे पैसे या उपक्रमासाठी वापरले असतील, हे विचारले तर ती काय म्हणेल?
स्वतः श्री.वामनराव अजूनही त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून रॉयल्टी घेत नाहीत.
त्यात विशेष ते काय? पु. लं. देशपांड्यांनीही आपल्या पुस्तकांच्या रॉयल्टीमधून अशी कामे केली आहेत. पु. लं. च्या पुस्तकांची रॉयल्टी तर कित्येक लाखांत असते, पण पु. लं. नि कधी त्याचा गाजावाजा केला नाही!
अहंकाराचा नाश करण्यासाठी देवाची स्थापना अंतर्मनात करणे आवश्यक आहे
हे चुकीचे आहे. देव या संकल्पनेचा उद्देश आपले अपूर्ण ज्ञान झाकणे हा आहे. देवाची अनुभूती म्हणजे ज्ञान नव्हे, तर ज्ञानाची मर्यादा जाणणे आहे. अहंकाराच्या जागी देवाची स्थापना म्हणजे 'टू रिप्लेस अ झीरो बाय अनादर झीरो' यासारखे आहे.
स्वखुषीचा हा मामला आहे. मला हवे ते मिळाले तर मी त्यासाठी काही देण्याची तयारी दाखवली तर त्यात गैर ते काय?
काहीही गैर नाही, पण मग याला जर कुणी 'अध्यात्माचा धंदा' असे म्हटले तर त्यातही काही गैर नाही!
समाज हा अजाण बालकासारखा असतो. तो स्वतःहून कुणाला 'सद्गुरु' वगैरे बनवत नाही. पण समाज हा असुरक्षितही असतो. त्यामुळे 'तुला याची गरज आहे, बघ हं, हे नाही केलंस तरे ते तसं होईल!' असं सांगून घाबरवणं फार सोपं असतं. मला जर समाजकार्यच करायचे आहे, तर मी ते माझ्या पद्धतीने, गाजावाजा न करता आणि कोणतेही पद न घेता करू शकतो. पण मग त्यात माझ्या संतत्वाचे 'मार्केटिंग' होत नाही. फोटो, पुस्तके, ध्वनीफिती ही ती 'मार्केटिंग टूल्स' आहेत. 'स्वत्व सोडा' असं सांगणाऱ्या गुरुंना आपल्या प्रवचनाच्या पोस्टरवर स्वतःचे छायाचित्र हवेच असते! शेवटी सगळ्यांचे पाय मातीचेच! कुणी हे कबूल करतील, कुणी नाही, एवढाच काय तो फरक!