सार्वजनिक गणेशोत्सवात फक्त वर उल्लेख केलेल्या गोष्टींचेच शिक्षण मिळते असे नाही, तर खालील गोष्टीही विनामूल्य शिकायला मिळतात:
१. आपल्या 'एरिया' तून सक्तीने गणेशोत्सवाची वर्गणी गोळा करणे, वर्गणी न देणाऱ्याला किंवा देण्यास कुरकूर करणाऱ्याच्या दुचाकी /चारचाकी वहानाचे टायर चाकूने फाडणे ते त्याच्या बायकोला किंवा तरुण मुलीला 'आवाज टाकणे' ते धक्काबुक्की करणे.
२. संध्याकाळी १२०-३०० चा तोबरा भरुन, हूड असलेली टोपी उलटी घालून, पाऱ्याचा 'रिफ्लेक्टर' गॉगल घालून शरीराच्या खालच्या भागाची विवक्षित हालचाल करत 'श्रीं' च्या साक्षीने नृत्य करणे
३. जास्तीत जास्त मेगावॉटची 'स्पीकर भिंत' उभी करून त्यावर सतत गोविंदा, भप्पी लहरी ते हिमेश रेशमिया अशा महान कलाकारांच्या गाण्यांची खैरात करणे. रात्री अमुक वाजता ध्वनीवर्धक बंद करावे अशा नियमांकडे सपशेल दुर्लक्ष करणे, आसपास रहाणारे वृद्ध, आजारी, लहान मुले यांची संख्या आणि ध्वनिवर्धकाचा आवाज याचे सम प्रमाण ठेवणे.
४. कुणाशीही संभाषण करताना चुकूनही आदर, नम्रता यांचा बोलण्यात लवलेश येऊ न देणे ' तोडणे, टोले टाकणे, राडा करणे, टपकवणे, नडणे, नष्टर' असे नवनवीन शब्दप्रयोग मराठी भाषेला बहाल करून मराठी भाषेच्या संवर्धनास हातभार लावणे
५. श्रीगजाननाची प्रतिष्ठापना झालेल्या चबुतऱ्याच्या खालच्या भागात असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन 'कच्ची क्वाट्टर' मारण्याचे कौशल्य आत्मसात करणे
६.'सुका ढोस देणे' या विषयावर विशेष प्राविण्य मिळवणे. 'मिटवायचंय का वाढवायचंय' या विषयातली पदविका मिळवणे.
७. उत्सवाचा फायदा घेऊन इलाख्यातल्या सोज्वळ मुलींना 'फ्रेंडशिप' मागणे, त्यांनी भीक न घातल्यास डूख धरणे.
८. विसर्जनाच्या मिरवणुकीस शक्य तितका अधिक वेळ लावणे, मिरवणुकीस शिस्त लावू पहाणाऱ्या 'मामा' बरोबर शक्य तितक्या शिवराळ भाषेत हुज्जत घालणे, संधी मिळाल्यास त्याला 'टोले टाकणे', पण अधिक कुमक येताच भेकडपणे पळून जाणे.
९. गुलालाचा मुक्तहस्ते वापर करणे, शेजारून जात असणाऱ्या वहानांमधे मूठ घुसवून गुलाल फेकण्याची कला शिकून घेणे.
१०. मांडवाचा आकारामुळे वहानांची कोंडी करण्याचा आटोकाट प्रयत्न करणे, मग अशा कोंडीत स्वयंस्फूर्तीने घुसून वहातूक नियंत्रणाचे काम करणे, हे करत असताना 'ओ अंकल, शिद्धा चलो ना, ए चिकने, दिखता नही क्या, ए टकले, लगावू क्या एक' असे शेलके 'ड्वायलॉक' मारून फिदीफिदी हसणे.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे किती म्हणून फायदे सांगावेत!
टीप: या प्रतिसादातील तपशीलासाठी संतोष शिंत्रे यांच्या 'साप्ताहिक सकाळ' २००४ कथास्पर्धेतील द्वितीय पारितोषिकपात्र 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' या कथेचा आधार घेतला आहे.