आखाती देशात नोकरी करण्यास्तव जाण्यासाठी तिथल्याच एखाद्या स्थानिकाला, सरकारात तुमची हमी द्यावी लागते. अशी एखाद्याने हमी दिली तरच तुम्हाला तिथल्या प्रवेशासाठी 'व्हिसा' मिळतो. अशा व्यक्तीला, कंपनीला 'स्पॉन्सर' असे म्हणतात. त्याच्या हमीवर तुम्ही त्या देशात प्रवेश मिळवल्यावर तुमच्या प्रत्येक चांगल्या/वाईट कृतीला तुमच्या इतकाच स्पॉन्सरही जबाबदार असतो. त्यामुळे तुम्ही एखादा गुन्हा करून मायदेशी पळून जाऊ नये, दोन ठिकाणी नोकरी करू नये या साठी तुमचा पासपोर्ट स्पॉन्सर स्वतः जवळ ठेवून घेतो. त्यात घाबरण्यासारखे काही नाही. (तुमच्या ठायी काही पापबुद्धी नसेल तर...)

सर्वच कंपन्या, स्पॉन्सर असे करतातच असे काही नाही. मी नोकरीत असे पर्यंत माझा पासपोर्ट कंपनीत जमा होता. परंतु, नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करू लागल्या पासून माझा तसेच माझ्या सर्व स्टाफचा पासपोर्ट माझ्या जवळच असायचा. स्पॉन्सरकडे नाही. हा स्पॉन्सरचा माझ्यावरील विश्वास आहे. असे अनेक स्पॉन्सर्स आहेत.

भारतात एजंट काहीही करू शकतात. त्यांचे कमिशन मिळाले म्हणजे झाले. पण हे वैयक्तिक एजंटगिरी करणारे असे फसवू शकतात. मोठ्या एजंट कंपन्या असे करीत नाहीत. मी मॅक्नीनॉन मॅकेंझी ह्या कंपनी मार्फत गेलो होतो (१९८१). त्या मुळे तशी भीती नव्हती.

मॅक्नीनॉन मॅकेंझी तर्फे जाण्या आधी एका वैयक्तिक एजंट मार्फत सौदीच्या सी पोर्टचा जॉब मिळाला होता (१९७४). त्या एजंटाने माझ्या नावाचे बॉम्बे डॉकच्या अधिकारांच्या सहीचे आणि बॉम्बे डॉकच्या लेटर हेड वरच ५ वर्षाच्या अनुभवाचे पत्र मिळविले होते. (कसे कोण जाणे). परंतु, अशा खोट्या अनुभवपत्रावर परदेशा जाण्यास मी नकार दिला आणि वाचलो. असो.

 आखाती देशांत आता ऑनसाईट वर जाणाऱ्यांची परिस्थिती कशी आहे? 

नोकरी मिळविण्या आधी किंवा मिळाल्या नंतर (भारत सोडण्याआधी) त्या देशातल्या कुणा ओळखीच्या माणसाकडून त्या कंपनीची बाजारातील पत, विश्वासार्हता पडताळून पाहावी. हे उत्तम. भली-बुरी माणसे जगात सर्व ठिकाणी आहेत/असतात.

आखाती देशातील वास्तव्याची परिस्थिती इथे बसून ऐकीव बातम्यांवर जेवढी भयावह वाटते तेवढी अजिबात नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला आखातातच काय पण जगात कुठल्याही देशात (भारतासह) धोका असतोच. सरळ मार्गाने जाणाऱ्या सभ्य माणसास (भारताप्रमाणेच) धोका सर्वात कमी.

सर्व लेख चांगले आहेत. अभिनंदन.