(गैरसमज टाळण्यासाठी प्रथम हे सांगणे आवश्यक आहे की मी स्वत: श्रद्धावंत नाही, सर्वसाक्षींच्या वर्गीकरणाप्रमाणे चुलत तर नव्हेच पण सावत्र भक्त सुद्धा म्हणवून घेऊ शकत नाही. आता वयोपरत्वे सैल झाली असली तरी मूळ भूमिका बुद्धिप्रामाण्यवादाचीच आहे.)

मला वाटते आपण बहुतेक लोक स्वत:ला बुद्धिमान आणि एकाच वेळी संवेदनाक्षमही व तर्कनिष्ठही समजत असतो. स्वत:चे मडके पक्के व इतरांचे कच्चे असा निर्णय मग आपण सहजासहजी घेऊन टाकतो. यात बरेचदा सत्य असतेही, पण आपण समजतो तितके ते बहुधा नसते. पण परिणामी आपण आपले काहीतरी उचलून धरणे व आपल्याला न रुचणाऱ्या कशाचा तरी उपहास करणे हे खूप उत्साहाने करतो.
या पार्श्वभूमीवर विलासरावांचा हा लेख, संजोपरावसाहेबांचा गुलज़ारवरील लेख व आपले एकेकाळचे लोकप्रिय मनोगती तात्या यांचा आंब्यांवरचा लेख यात मला काही साम्यस्थळे दिसली. कृपया न रागावता विचार करून पहावा ही विनंती. या तिन्ही लेखांत
लेखक लोकांना अनाकलनीय वाटणाऱ्या व्यक्ती वा विषयाबद्दल बोलत आहे.
लेखकाच्या मते त्यात निश्चितपणे काहीतरी थोरपणा आहे.
तो वाचकांना आवाहन करतो आहे की त्यांनी ही थोरवी जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
तो हेही सांगतो आहे की वरवर विचार करून फालतूपणा, खोटेपणा किंवा मूर्खपणा म्हणून सोडून द्यावे असा हा विषय नसून खोलात गेल्यास त्यात काहीतरी सत्त्व गवसू शकते.
आता त्यात्या लेखकाच्या या भूमिकेत सत्य-असत्य किती, त्याचे म्हणणे योग्य की अयोग्य, हा निर्णय प्रत्येक वाचकाला स्वत:ला घ्यावा लागेल व तो त्याने घ्यावा.
माझ्यापुरते सांगायचे तर काव्य, संगीत व अध्यात्म या प्रत्येकात काहीतरी अंतिम, काहीतरी सत्य, काहीतरी जिवाच्या जवळचे, काहीतरी जीवनाला आधार देणारे,  असू शकते असे मला वाटते. मग मला स्वत:ला या सगळ्यांचा अनुभव या जन्मी येवो वा न येवो. मी या किंवा अशा प्रत्येक क्षेत्रातल्या "पोचलेल्या" व्यक्तीचा आदर करणे पसंत करीन.

दिगम्भा