१. जास्तीत जास्त पैसा पाहिला जातो. पैसा हि आवश्यक बाजू असली तरी त्यालाच किती पकडून बसायचे हा पण एक मुद्दा आहे.
इथे प्रेमविवाहाची नाही, तर ठरवून केलेल्या विवाहांची गोष्ट चालली आहे ना? मग मुद्दाम कमी पगार असलेला वर (किंवा वधूसुद्धा) कोण कशाला बघेल? तुम्ही बघाल का?
अर्थात पैसा हे सर्वस्व नव्हे, किंवा पैशाला अवाजवी महत्त्व देऊ नये, हे मान्य. परंतु हे उभयपक्षी होत नाही का? आणि "कुटुंब चालवण्याची जबाबदारी प्राथमिकतः पुरुषाची" या आपल्याकडील संकल्पनेत अधिकतर उत्पन्न असलेला वर पाहणे हे (कदाचित योग्य नसले तरी) साहजिक नाही का?
(उलटपक्षी, "कुटुंब चालवण्याची जबाबदारी केवळ पुरुषाची नव्हे, तर दोघांची" असे मानणारी वधू भेटली - आणि हल्ली अशाही खूप भेटत असाव्यात असे वाटते - तरी आपले उत्पन्न कमी असताना जास्त उत्पन्न असलेल्या अशा वधूबरोबर लग्न करताना - तिची कितीही मान्यता असली तरी - आपला पुरुषी अहंकार आड येणार नाही का?)
एक पूर्णपणे अवांतर मुद्दा: वराचे उत्पन्न मांडताना, वर परदेशस्थित असेल तर मात्र गोची होते. कारण, परकीय चलनात उत्पन्न मांडल्यावर तेथील जीवनमानाच्या संदर्भात हे उत्पन्न कमी, जास्त की ठीकठीक याची बऱ्याचदा कल्पना नसल्यामुळे त्याचे सध्याच्या चलनदराप्रमाणे भारतीय रुपयांत रूपांतर करून तुलना केली जाते, जे सर्वस्वी अयोग्य (आणि misleading [मराठी?]) आहे. अशा वेळी योग्य कल्पना देण्याकरता त्या बिचाऱ्या वराने काय बरे करावे?
२. मुलाचा स्वतःचा फ्लॅट असेल तर लगेच वेगळे राह्ण्याची अपेक्षा. सासू सासऱ्यांची जबाबदारी नको.
यात नेमके काय गैर आहे? उद्या मुलीने म्हटले, की तिच्या आईवडिलांची जबाबदारी तुम्ही घ्यावी, तर आहे तुमची तयारी?
आणि मुळात आईवडिलांची जबाबदारी मुलांची ही संकल्पना नेमकी कोठून आली? आईवडिलांनी आपल्याला वाढवले, मोठे केले ते मातृपितृऋण आपण आपल्या अपत्यांना वाढवून, त्यांचे संगोपन करून, त्यांना मोठे करून फेडायचे असते. मुलांची जबाबदारी ही आईवडिलांची असते, उलट नव्हे. आपल्या वृद्धत्वाची जबाबदारी ज्यानेत्याने स्वतः घ्यायची असते - ते झेपेनासे झाले की वानप्रस्थाश्रम आणि सन्यासाश्रम हे आपल्या संस्कृतीत सांगितलेले आहेतच. (किंबहुना आपण वानप्रस्थाश्रमाचा पूर्णपणे त्याग केला आणि वृद्धाश्रमही धड स्वीकारला नाही, हीच आपल्या संस्कृतीची शोकांतिका आहे, असे सद्य लेखकाचे मत आहे. परंतु हे पूर्णपणे अवांतर.) अर्थात एखाद्याने स्वेच्छेने आपल्या आईवडिलांची म्हातारपणी काळजी घेतली, तर त्याला विरोध नाही, पण ही त्याच्यावर सक्ती नाही किंवा ही त्याची जबाबदारी होऊ शकत नाही.
मग अशा परिस्थितीत मुलीने सासूसासऱ्यांची जबाबदारी घ्यावी ही अपेक्षा अथवा सक्ती कशी करता येईल? हे कितीसे रास्त आहे?
३. मुलगा अपेक्षेनुरूप असला तरी जर तो मुलीच्या राहत्या ठिकाणापासुन ४-५ तासाच्या अंतरावर असेल तर नको. आई वडिल सासरच्याच गावात पाहिजेत.
एक अपेक्षा म्हणून यात नेमके काय गैर आहे? तिला जर वाटत असेल की हवे तेव्हा आपल्याही आईवडिलांना जाऊन भेटता यावे, तर त्यात काय चुकले?
तडजोड ही नेहमी मुलीनेच केली पाहिजे का?
४. क्रेडिटकार्ड, मोबाईल अत्यावश्यक.
क्रेडिटकार्ड आणि मोबाईल या भारतात अजूनही जीवनावश्यक गोष्टी आहेत की नाही याची कल्पना नाही (अलीकडच्या भारतभेटीत अमेरिकेपेक्षा भारतातच मोबाईलचा सुळसुळाट अधिक असल्यासारखे वाटले), परंतु क्रेडिटकार्ड आणि मोबाईल या वस्तू जर वराच्या - किंवा कोणाच्याही - आर्थिक स्थितीच्या निदर्शक बनल्या असतील, तर अशी अपेक्षा योग्य किंवा अयोग्य म्हणू इच्छीत नाही, पण साहजिक निश्चितच आहे. ("हल्ली पानवाल्याकडेसुद्धा मोबाईल असतो, आणि याच्याकडे नाही? म्हणजे याला मोबाईलसुद्धा परवडत नाही की काय? म्हणजे स्थिती काय म्हणायची याची?" असाही विचार होत असणे अशक्य नाही, आणि वधूच्या दृष्टिकोनातून हे अगदीच अवाजवी आहे असेही म्हणवत नाही.)
५. खाजगी कंपनीत उच्चपदस्थ असावा (ही अपेक्षा गैर नाही). पण १०-७ सरकारी वेळेनुसार घरी यावा (सध्याच्या जमान्यात खाजगी नोकरीत अशी अपेक्षा कशी ठेवता येईल?).
उच्चपदस्थ वधू प्रियालीताईंनी म्हटल्याप्रमाणे रात्रीअपरात्री ऑफिशियल पार्ट्यांना तर सोडा, पण कामाच्या जबाबदारीमुळे / व्यापामुळे जर रात्री उशिरा घरी येऊ लागली, तर किती नवरे ते 'खपवून घेऊ' शकतात?
मग ही अपेक्षा उभयपक्षी का नसावी?
६. मुलाच्या शारीरीक ठेवणीत तसूभर्ही तडजोड नाही. माझ्या एका मित्राला तो ५ फूट ७ इंच उंच आहे म्हणून नाकरले. त्या मुलीला ५ फूट ८ इंच उंच नवरा हवा होता. बाकि सर्व द्रुष्टीने पसंती होती.
आकडेवारी उपलब्ध नाही , पण हे उभयपक्षी होत असावे, असे वाटते.
७. एका मुलाला पर्यटनाची आवड होती. मुलीचे म्हणणे, "तो मला दर महिन्याला सारखे उन्हात फिरवत बसेल".
(माझ्या मैत्रीणींबरोबर जेव्हा आमची चर्चा होते तेव्हा त्यांच्या अपेक्षेमधे वरचेच प्रतिबिंब होते.)
आता नाही तिला पर्यटनाची आवड! नसते एकेकाला/एकेकीला! निदान आधीच स्पष्टपणे म्हणतेय ना, की मला ते पर्यटनबिर्यटन उन्हातान्हात फिरणे नाही जमायचे, तेव्हा आपले जमणे शक्य नाही, तू तुझा मार्ग शोधायला मोकळा, मी माझा म्हणून! प्रत्येकाच्या आवडीनिवडी जमल्याच पाहिजेत असे थोडेच आहे? आणि मूलभूत आवडीनिवडी जुळत नसताना, अशा दोन व्यक्तींनी, आपल्या आवडी मारून, लग्न केलेच पाहिजे असा अट्टाहास का? तडजोड वगैरे सगळे ठीक आहे, पण मुळात गरजच काय? त्यापेक्षा आपल्या हीरोने पर्यटनाची आवड असलेली एखादी मुलगी बघावी!
अशीच यादी आणखीन वाढवता येईल. ह्या सर्व गोष्टींमुळे मुलींची लग्ने उशीरा होतात. मुलगी २७-२८ वर्षांची झाली तर ती थोराड/जून दिसायला लागते. मुले तिला नाकारतात. कारण मुलगी लहान व नाजुक असावी अशी मुलांची अपेक्षा असते.
एक तर थोराड / जून वगैरे शब्द जबरदस्त खटकले. (म्हणजे काय भाजीची गड्डी आहे काय?) दुसरे म्हणजे, "मुलगी लहान व नाजूक असावी" ही मुलांची (तथाकथित) अपेक्षाच मुळात आपल्याला कितपत रास्त वाटते? मुलगी लहान आणि नाजूक का असावी? लहान आणि नाजूक असली, की तिला जगाचा अनुभव / अक्कल* आलेली नसते म्हणून? (इथे अक्कल हा शब्द कोणत्याही derogatory अर्थाने वापरलेला नाही. नुकत्याच कॉलेजातून बाहेर पडण्याच्या वयात किंवा अगदी कॉलेजातून बाहेर पडून नोकरी करून एकदोन वर्षे झाल्यावरसुद्धा, मुलगा किंवा मुलगी दोघांनाही, स्वतःला कितीही वाटले तरी, पुरेशी अक्कल आलेली नसते, हे सद्य लेखकाचे ठाम मत आहे. सद्य लेखकालाही नव्हती, हेही तो इथे नमूद करू इच्छितो.) आणि मग अशा परिस्थितीत ती आपले काय वाटेल ते ऐकून घेईल म्हणून?
८. एक मुलगी केवळ बी. कॉम. होती. नोकरी पण नव्हती. तिच्या घरची परिस्थिती बेताची होती. पण तिला सॉफ्टवेअर मधला कमीत कमी ६०००० पगार असणारा मुलगा हवा होता.
सद्य उदाहरणातील विशिष्ट परिस्थितीबद्दल अधिक माहिती नसल्यामुळे विस्ताराने बोलू इच्छीत नाही, परंतु १. बी.कॉम. आहे, २. नोकरी नाही, आणि ३. घरची परिस्थिती बेताची आहे म्हणून त्या मुलीने स्वतःला कमी का मानावे? यात नेमके कमीपणाचे काय आहे? की सॉफ्टवेअर / कॉलसेंटर वगैरे क्षेत्रांमध्ये नोकरी करणारेच तेवढे उच्च आणि बाकी सगळे हीन असे काही म्हणायचे आहे?
आणि सॉफ्टवेअरमधल्या कमीत कमी ६०,००० पगार असणाऱ्या मुलाच्या अपेक्षेबद्दल म्हणाल, तर ६०,०००पेक्षा कमी पगारात हल्ली काय भागते? असे पगार सॉफ्टवेअर / कॉलसेंटर यांव्यतिरिक्त कोणत्या क्षेत्रांत मिळतात? आणि तिला स्वतःला जरी नोकरी नसली, तरी "कुटुंब चालवण्याची जबाबदारी प्राथमिकतः पुरुषाची" हे मानणाऱ्या तुमच्या - आपल्या! - संस्कृतीत त्यामुळे नेमका काय फरक पडतो? मग तिने अशी अपेक्षा का करू नये?
आणि १. बी. कॉम. असणे, २. घरची परिस्थिती बेताची असणे आणि ३. नोकरी नसणे हे तुमच्या लेखीचे अगदी 'मायनस पॉइंटस' जरी मानले, तरी तिच्यात इतर काही 'प्लस पॉइंटस' नसतील कशावरून?
थोडक्यात, जो जे वांछील तो ते लाहो, आणि कोणीही कोणाचीही कोणाशीही तुलना करू नये.
- टग्या.
(व्यक्तिगत संदर्भाचा वाटलेला मजकूर काढून टाकला : प्रशासक)