मराठी टिकून राहण्याकरता खालील बाबतीतही साधना करता येईल!

१) वृत्तपत्रात किंवा साप्ताहिकात एखादा इंग्रजी शब्द लिहिला जातो. तो शब्द हजारो माणसं वाचतात. नकळत ती माणसंही तो इंग्रजी शब्द वापरू लागतात. आपण अश्या पत्रकारांना, स्तंभलेखकांना पत्र लिहून अथवा भेटून, 'आपल्या लिहिण्यात केवळ आणि केवळ मराठी भाषेचाच वापर करा' असे कळकळीचे आवाहन केले पाहिजे. तसेच त्यांच्या लेखनात तश्या सुधारणा दिसतात किंवा नाही याचाही पाठपुरावा केला पाहिजे!

२) मराठी नाटक अथवा मराठी चित्रपट/दूरचित्रवाणी मालिकात देखील अगदी सहजतेने अमराठी/इंग्रजी शब्दांचा वापर होताना आपण पाहतो. प्रेक्षकांवर याचा परिणाम खूपच सहजतेने होऊ शकतो आणि तो प्रेक्षक तेच शब्द त्याच्याही लिहिण्या-बोलण्यात सर्रास वापरायला लागण्याची दाट शक्यता असते. नाटक किंवा चित्रपट ही माध्यमंच तेवढी प्रभावी आहेत. आपण संबंधित नाटककार, पटकथाकार, अभिनेते आणि दिग्दर्शक यांना भेटून, ''आपल्या लिहिण्याबोलण्यात आणि प्रकटीकरणात केवळ आणि केवळ मराठी भाषेचाच वापर करा' असे कळकळीचे आवाहन केले पाहिजे. तसेच त्यांच्यात तश्या सुधारणा दिसतात किंवा नाही याचाही पाठपुरावा केला पाहिजे!

वरील पहिला मुद्दा हा वाचनाचा आणि दुसरा मुद्दा हा दृकश्राव्य माध्यमाशी निगडीत आहे. वाचलेले, किंवा रंगमंचावर/पडद्यावर पाहिलेले चांगले लक्षातही राहते व नकळत अनुसरलेही जाते असे मानसशास्त्रीय वैद्यक सांगते! एखाद्या व्यक्तिला, 'तू मराठीतच लिही किंवा बोल' हे सांगून काहीही होणार नाही. तर ज्या व्यक्ती लोकाभिमूख आहेत, ज्यांचा एकाच वेळी त्यांच्या लिहिण्यातून, बोलण्यातून, अभिनयातून, अनेक लोकांशी संबंध येतो त्या व्यक्तींकडे याचा पाठपुरावा केला पाहिजे, आणि तो सातत्याने केला पाहिजे असे मला वाटते!

जे उपाय सुचले ते इथे लिहिले आहेत. यापैकी एकही उपाय मी वेळेअभावी करू शकत नाही, हे इथे प्रांजळपणे नमूद करते!

माधवी.