माझ्या माहितीनुसार मुंबई टाइम्स ही मटा पुरवणी तरुण वर्गाला आकर्षीत करण्यासाठी योजलेली आहे. साहजिकच मागणी तसा पुरवठा या नात्याने महाविद्यालयीन पिढीला खेचण्यासाठी या वर्गात लोकप्रिय अशी आंग्लाळलेली मराठी वापरली जाते ज्यायोगे या लक्ष्यवर्गाला ही पुरवणी आपली वाटावी.

अर्थात उत्तम पुरवणी शुद्ध मराठीत प्रकाशित करून वा काहीतरी कॢप्ती काढून तरुणांना मराठीकडे वळवणे, आकर्षीत करणे हे मटा ला निश्चितच शक्य आहे. पण आजच्या धंदेवाईक युगात इतके कष्ट कोण घेणार? वर्तमानपत्रांचे प्रथम व्यापारीकरण झाले होते आता 'बाजारीकरण' झाले आहे असे नाईलाजाने म्हणावे लागेल. सवंग वाहिन्या आणि गल्लाभरू वर्तमानपत्रे यांना धंदा व नफा प्राथमिक महत्त्वाचा. आपला खप कसा वाढेल हे प्राथमिक ध्येय. आपण पहिले कसे, इतरांना आपण कसे मागे टाकू? हे प्राथमिक चिंतन. मग जमलेच तर बातम्या व समाजप्रबोधन वगैरे वगैरे.

इंग्रजी शब्दांच्या वापरा बरोबरच चुकीचे वाक्प्रचार, म्हणींचा सदोष वापर व अनेकदा नको ते शब्द वापरून हीन अभिरुचीचे प्रदर्शन मटा घडवीत असतो. दोन एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. वांद्र्याला अनेक 'प्रेमळ जोडपी' समुद्रात जरा आत उतरून खडकांवर प्रणयाराधन करताना आढळतात. असेच एक जोडपे आपल्या प्रणयात इतके गुंगले की त्यांना भान आले तेव्हा पाणी चहुकडून भरल्याचे व भरतीमुळे काठावर परतणे शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घाबरून आरडाओरडा केला व अखेर पोलिस, स्थानिक मच्छीमार यांनी त्यांना वाचवले व सुखरूप परत आणले. मटा ने पहिल्या पानावर छपलेल्या या बातमीचे शीर्षक होते 'सागरा प्राण तळमळला'!!!!! ज्या शब्दांनी प्रत्येक मराठी माणसाला स्वा. सावरकरांची आठवण येते व हात नकळत जुळतात ते शब्द इतक्या गलिच्छ घटनेला अनुलक्षून वापरणारे मटा चे पत्रकार आणि ते प्रसिद्ध करू देणारे संपादक यांच्या विषयी आणखी काय बोलावे?

जर मराठी माणसांनी, विशेषतः: तरुणांनी मटा वा असे इंग्रजाळलेली वर्तमानपत्रे घेणे बंद केले तर त्यांचे डोळे आपोआप उघडतील व त्यांना मराठीचा मान राखावाच लागेल.