हे पाहिल्यावर मला तर मराठी ही विज्ञानभाषा करता येवु शकते या बद्दल संदेह राहिला नाही.

किंचितसा सहमत. महाराष्ट्राच्या अधिक्षेत्रात किंवा महाराष्ट्रातील विद्यापिठांद्वारे आयोजित केलेल्या आणि मराठी ही उतराची भाषा म्हणून निवड करण्याचे स्वातंत्र्य असलेल्या परीक्षांमध्ये तसेच मराठी माध्यमातून होणाऱ्या शालेय शिक्षणाच्या पातळीवर मराठी ही विज्ञानभाषा बनू शकेलही. मात्र अशा परीक्षांना बसणारा विद्यार्थीवर्ग, त्यांचे मूलभूत शिक्षणाचे माध्यम, मातृभाषा इत्यादीचा विचार करता असे करणे किती दुरापास्त आहे, याची कल्पना यावी. जर्मनीत होणाऱ्या परीक्षांसाठी ज़र जर्मन भाषाच उत्तर देण्याची भाषा म्हणून वापरली ज़ात असेल, तर त्यात तितकेसे नवल वाटायला नको; कारण परीक्षा देणाऱ्या बहुतांश विद्यर्थ्यांची मातृभाषा अथवा मूलभूत/शालेय शिक्षणाची भाषाही जर्मनच असावी. मात्र पुणे किंवा मुंबई विद्यापीठ तसेच इतर विद्यापिठांच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असे मूलभूत/शालेय शिक्षण मराठीतून झालेले किती आणि ज्यांची मातृभाषाही मराठीच आहे, असे किती, याचा विचारही करायला नको का?

इंग्रजी विश्व-भाषा आहे आणि त्यामुळे इथले लोक त्या भाषेचा वापर सुद्धा लिलया करतातच. पण मूळ शिक्षण मातृभाषेतून झालेले असल्याने त्याचे अनेक फायदे त्यांना मिळाले असतील असेच वाटते.

याला प्रतिसादादाखल, याच चर्चेतील एक सहभागी सदस्याशी व्यक्तिगत स्वरूपात झालेल्या चर्चेतील माझी भूमिका येथे उधृत करावीशी वाटते. ती अशी -

मूलभूत शिक्षण - शास्त्रीय तसेच अशास्त्रीय - मातृभाषेतच व्हावे, हे माझे ठाम मत आहे; आणि त्या दृष्टीने असे शब्द शालेय पाठ्यक्रमात निश्चितच सामावून घेता येतील. मात्र त्यानंतर महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षणाचे दरवज़े खुले झाले, की आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्ञानसाधना करताना या शब्दांचे गाठोडे मी प्रतिसादातच म्हटल्याप्रमाणे लाँचपॅड किंवा अँटिक्स म्हणून ज़वळ असण्यात काही गैर नाही.