नंदकिशोर,
आपण माझे प्रतिसाद नीट वाचलेले दिसत नाहीत. माझ्या पहिल्याच प्रतिसादात मी हे म्हटले की 'वर्षांनो वर्ष दलितांची परवड, ससेहोलपट चालली आहे, हे मान्य. आणि समाज प्रबोधन खऱ्या अर्थाने झाल्याशिवाय ह्यांतून त्यांची सुटका नाही, हेही मान्य.
पण आपल्या [विकींच्या] काही विधानांमध्ये काही गफलती आहेत.'
दलितांवर होणाऱ्या अन्यायांची मी कशाही प्रकारे भलावणूक केलेली नाही. किंबहुना त्यांची ससेहोलपट वर्षानुवर्षे चालू आहे, व अजूनही ती तशीच चालू आहे, हे सत्य मी सरळ मान्य केले आहे. माझे प्रतिसाद ज्या तऱ्हेने त्यांनी ही खऱ्या अर्थाने गंभीर विषयावरची चर्चा सुरू केली, त्याबद्दलचा आक्षेप नोंदवण्यासाठी आहे.
विकींनी तीन मुद्यांना घेऊन चर्चा सुरू केली. त्यांपैकी 'मछिंद्र कांबळी, कांबळे संबोधल्यावर एवदे रागावतात का' हा मुद्दा मी ते नाटक न बघताही खोडून काढावयाचा प्रयत्न केला. समजा अगदी मनापासून जरी ह्या कांबळींना स्वतःला दलित म्हटल्याबद्दल राग येत असेल, तरी त्यांचातला यशस्वी नाटक निर्माता त्यांना उघडपणे तसे नाटकात दाखवू देईल काय? ह्या प्रश्नाचे साधे उत्तर 'नाही' असे आहे. त्यांचा दुसरा मुद्दा निवडणूकांच्या गणिताच्या संदर्भात होता, त्याचेही सरळ, सोपे उत्तर मी दिले असे मला वाटते.त्यांचा तिसरा मुद्दा शिवसेनेच्या संदर्भात होता, व त्याबद्दल त्यानी नुसते एक विधान केले, पण त्याबद्दल काहीही संदर्भ दिलेला नाही.
म्हणजे इतक्या गंभीर विषयावर चर्चा ज्या मुद्द्यांना धरून करण्यात आली, ते पोकळ होते, हे इथे मी परत म्हणतो. माझे प्रतिसाद त्याविषयीचे आहेत. मी अगोदरच लिहिल्याप्रमाणे तुम्ही काही मुद्दे मांडले की त्यांना सय्युक्तिक कारणे देण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. परत म्हणतो, दलितांच्या प्रश्नांवर खूप जिव्हाळ्याने चर्चा करता येईल. पण त्याच्यासाठी जबाबदारीचे लेखन हवे.
'विकींचा मुद्दा फालतू वाटत असेल तर एक महिना कांबळे आडनाव लावून फिरा..... '
हे करण्याची जरूर मला दोन कारणांमुळे नाही. पहिले हे की समज यावयाच्या वयात मी साम्यवादी चळवळीच्या लोकात वाढलो. त्यानंतर अनिल अवचट वगैरेंच्या लेखनाचा परिणाम झाला. एकच उदाहरण द्यावयाचे झाले तर मी त्यांच्या 'एका गोसाव्याची तोड'चे देईन. १९७९ साली लिहिलेल्या ह्या लेखातील भीषण परिस्थिती अजूनही तशीच आहे, ह्या जळत्या वास्तवाची मला पूर्ण जाण आहे. दुसरे असे की मी परदेशात राहतो, जिथे भारतीय माणसांना जी एक विशिष्ट वागणूक मिळते, ती घेताना जर पहिल्यांदा काय जाणवले तर, हीच वागणूक आम्हीही आमच्याइकडे दलितांना देतो ही.
प्रदीप