- मंत्रालयातील इंग्रजी टंकनलेखन यंत्रे फेकून दिली तर आंतरराज्यीय पत्रव्यवहार कसा करायचा?
- ज्या भाषेत लिहिलेले पत्र मिळते त्या भाषेत त्याला उत्तर देण्याचा प्रघात सर्व पुढारलेल्या देशात आणि भारतात केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये असतो. मंत्रालयात इंग्रजीत आलेल्या पत्राचे उत्तर कोणत्या भाषेत देणार?
- प्रत्येकाला मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे असे तथाकथित शिक्षणतज्ञ म्हणतात. महाराष्ट्रात सर्वच लोक मराठी भाषक आहेत का?
- एका बाजूला आदिवासींना त्यांच्या भाषेत शिकवावे असे म्हणतात तर दुसऱ्या बाजूला इंग्रजी शाळा बंद करा असा प्रचार. हे कितपत योग्य आहे?
- आपल्या देशातील आरक्षणाला कंटाळून हुशार विद्यार्थी परदेशी जातात तसे हव्या त्या माध्यमासाठी पालक मुलांना परप्रांतात पाठवायला लागले तर काय होईल? मला स्वतःला इंग्रजी माध्यम हवे म्हणून महाविद्यालयीन शिक्षणासाठी एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जावे लागले होते.
- ज्या पालकांची दर दोन-तीन वर्षांनी एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात बदली होते अशांच्या पाल्यांनी कुठल्या शाळेत जावे? माझ्या वडिलांच्या ४२ वर्षाच्या नोकरीत २६ बदल्या झाल्या होत्या. काबूल-क्वेट्टा-पेशावर-लाहोर पासून ते विशाखापट्टणमपर्यंत.
- कलकत्ता-पॉंडिचरीत फ़्रेंच माध्यमाच्या शाळा आहेत. मुंबई-जबलपूर-भोपाळमध्ये संस्कृत माध्यमाच्या शाळा आहेत. बिहारमध्ये देशातील सर्वात मोठे संस्कृत विश्वविद्यालय आहे. तर महाराष्ट्र शिक्षणात सर्वात मागासलेले राज्य आहे. महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांचा पगार देशात सर्वात कमी आहे. शेजारच्या मध्य प्रदेशात शिक्षकासाठी निवृत्तीचे वय ६५ आहे. मराठी मुलांना हिंदी-इंग्रजी व गणित नसल्याने येत नसल्याने केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षेत पास होणारी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली मराठीभाषक मुले जवळजवळ नसतात.
- महाराष्ट्रात भाषाशिक्षणाचा दर्जा अत्यंत हलका आहे. सर्वसामान्य मराठी मुलांना इंग्रजी- हिंदीतर सोडूनच द्या पण शुद्ध मराठीही लिहिता येत नाही.
- पूर्वप्राथमिक शिक्षण मातृभाषेतून(मग ती जगातली कुठलीही भाषा असो), पहिलीपासून मराठी-इंग्रजी, तिसरी ते नववी हिंदी,पाचवी ते आठवी आणखी एक भारतीय भाषा , आठवी ते दहावी संस्कृत आणि नववी-दहावीत एक परदेशी भाषा असा शिक्षणक्रम ठेवला तर माध्यमाचा प्रश्नच येणार नाही. गणित व शास्त्रे सेमी-इंग्रजीत आणि इतिहास-भूगोल कुठल्याही देशी भाषेत असेल. भारत विविधभाषी देश असल्याने असा शिक्षणक्रम आखावाच लागेल.