नंदकिशोर,

आपण लिहिता: '"अरे तू आमच्यातलाच..." ह्यावर कोणालाच प्रत्युत्तर द्यावेसे वाटले नाही.'

आपण दुसऱ्याने लिहिलेले प्रतिसाद नीट वाचता, की तसे काही न करता, आपणाला जे हवे आहे, तेच लिहिता? असे विचारण्याचे कारण हे, की, 'थोडक्यात' अशा विषय-नावाने मी एक प्रतिसाद लिहिला होता. त्यात मी म्हटले:

'इथे एक नमूद करावेसे वाटते: वरील बरेचसे प्रतिसाद शहरी मंडळींचे होते असे वाटते. तरीही किमान एकतरी प्रतिक्रिया (नंदकिशोर ह्यांची), जी पण शहरातूनच आलेली होती, ती खूप बोलकी होती. 'अरे, तू आमच्यातलाच वाटतोस!' हा डंख जर दलितांवर शहरात सहजपणे जाता जाता होत असेल, तर गावात काय परिस्थिती असेल? मी त्यांच्या प्रतिसादावर लिहिल्याप्रमाणे १९७९ मध्ये अवचटांनी लिहिलेल्या 'गोसाव्याची तोड' ची भीषण, मन सुन्न करणारी परिस्थिती आता थोडीतरी बदललेली असेल काय? खैरलांजी प्रकरण बघता मलातरी शंका वाटते. '

हा प्रतिसाद तुम्हाला पुरेसा वाटला नाही, काय? ह्यापेक्षा आपण काय अपेक्षा करत आहात? का प्रत्युत्तर म्हणजे 'नाही, नाही, हे आम्ही म्हणतच माही' असे काहीतरी अपेक्षित आहे?

ह्या आपल्या प्रतिसादात 'हे इथे घाण करणार..' हे एक सोडून इतर सर्व जेजे काही आपण कथित केले आहे, ते सर्व आरक्षणाशी संबंधित आहे. तेव्हा आता आपण आरक्षणाविषयी चर्चा करणे भाग आहे. प्रथम आपणाला व विकिंना काही प्रश्न:

१. आरक्षण गेली कित्येक दशके चालू आहे. त्याने दलित समाजाचा किती फायदा झाला, असे आपणास वाटते? फारसा झाला नाही, असे आपले मत असल्यास तसे का?

२. आरक्षण अजून किती काळ चालू ठेवावे, असे आपणास वाटते?

३. आरक्षणाचा भाग (quota) अजून वाढवल्याने काय फायदा होईल दलित समाजाचा?

४. आरक्षण आहे तसेच चालवावे, का त्याच्या पद्धतीत काही बदल घडवावा? की ते संपूर्णपणे काढून टाकावे?

माझी मते मी नंतर मांडीनच.

'हे घाण करणार येथे...' ह्यात फारसे काही चूक नाही. अनंत चतुर्दशीला जे काही केले जाते, ते नि: संशय चूकच आहे आणि आपण सर्वानी त्याचा धिक्कारच केला पाहिजे. पण एक समाज काही एक चूक करतो, म्हणून आम्ही तशीच करणार, ह्यात काही बरोबर आहे असे मला वाटत नाही.

प्रदीप