जगातील कुठल्याही देशात मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही असे थोड्या विचारांती कुणालाही समजून येईल. जपानमध्ये असलेल्या एखाद्या मराठी भाषक अधिकाऱ्याचा मुलांना मराठीतून शिक्षण घेता येत नाही. त्याला जपानी किंवा एखाद्या जागतिक भाषेतूनच शिकावे लागते. फार काय, तामीळनाडूत मराठी माध्यमाच्या शाळा असणे दुरापास्त आहे. जगातल्या कुठल्याही देशापेक्षा अमेरिकेत जास्त भाषा बोलल्या जातात म्हणून काही तिथे त्यात्या भाषेतून शिअण मिळत नाही. त्यामुळे आपल्याच अविकसित मातृभाषेतून शिक्षण मिळावे हा आग्रह धरणे मूर्खपणाचे आहे. शिवाय अशा शिक्षणाचा शेजारच्या प्रांतातसुद्धा उपयोग होणार नसेल तर त्यापेक्षा अर्धशिक्षित राहणे पत्करले. प्रत्येक शिक्षण स्वान्तसुखाय नसते!
याचा अर्थ मराठी भाषेचा विकास करू नये असा नाही. पण प्रतिशब्द सुचवताना किंवा बनवताना काही पथ्ये जरूर पाळावीत.
- तो नवीन शब्द मूळच्या परकीय शब्दापेक्षा लिहायला किंवा उच्चारायला जास्त अवघड असू नये.
- त्याच अर्थ डोक्याला ताण न देता किंवा थोडासा विचार केल्यावर सहज समजावा.
- त्या शब्दाचा शक्यतो इतर देशी भाषेत काही विकृत अर्थ असू नये.
- मूळ परकीय शब्द थोडा अपभ्रष्ट करून त्याचे सोपे मराठीकरण होत असेल तर जरूर करावे. जसे पोलीस(पलिस्), व्हिसा(मूळ शब्द व्हीझा आहे), अकादमी.
- शब्द तयार करताना व्याकरणाच्या नियमाचा विचार करावा पण फार बाऊ करू नये. परकीय शब्दाला मराठी किंवा मराठी शब्दाला परकीय प्रत्यय लावण्यास हरकत नसावी. ऑक्सिजनला प्राणवायू. तर ऑक्साइडला प्राणिद, ऑक्झेटला प्राणेत, डायॉक्साइडला द्विप्राणिद वगैरे शब्द सहज समजण्यासारखे असल्याने वापरण्यासारखे आहेत. तसेच गंधक, गंधकिद, गंधकित, गंधकेत वगैरे.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे बनवलेला नवीन शब्द सहज रूढ होण्यासारखा असावा. मूळ परकीय शब्द खरोखर सोपा असेल तर अजिबात बदलू नये.