जगातील कुठल्याही देशात मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही असे थोड्या विचारांती कुणालाही समजून येईल. त्यामुळे आपल्याच अविकसित मातृभाषेतून शिक्षण मिळावे हा आग्रह धरणे मूर्खपणाचे आहे.  शिवाय अशा शिक्षणाचा शेजारच्या प्रांतातसुद्धा उपयोग होणार नसेल तर त्यापेक्षा अर्धशिक्षित राहणे पत्करले.

असहमत! जर्मनीमध्ये जर्मन ही मातृभाषा नव्हे काय? तेथे जर्मनमधून शालेय शिक्षणच नव्हे तर उच्च शिक्षणही मिळते, हे लिखाळरावांच्या प्रतिसादातून स्पष्ट झालेच आहे. तीच गोष्ट तामिळनाडू किंवा जपानच्या बाबतीत लागू होत नाही काय? त्यामुळे तुमचे जगातील कुठल्याही देशात मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही असे थोड्या विचारांती कुणालाही समजून येईल हे विधान तीव्र आक्षेपार्ह आहे. मुळात मराठी भाषा (किंवा कोणतीही (कोणाचीतरी) मातृभाषा) कोणत्या अंगाने अविकसित आहे, हे ठरवणारे तुम्हीआम्ही कोण? तसेच याचे पुरेसे दाखले न देता आपल्याच अविकसित मातृभाषेतून शिक्षण मिळावे हा आग्रह धरणे मूर्खपणाचे आहे असे विधान करणेही उचित ठरत नाही. भाषातज्ज्ञांच्या मतेही मराठी ही 'अविकसित' भाषा असल्याचे म्हटले गेल्याचे ऐकण्यात-वाचण्यात आलेले नाही. भाषेतल्या शब्दभांडारात, व्याकरणात त्रुटी आहेत; मुळाक्षरे/बाराखडी/लिपी, वाक्यरचना सदोष आहे, तर एक वेळ ती भाषा अविकसिततेकडे झुकणारी मानता येईल. पण मराठीच्या बाबतीत तशी गोष्ट दिसत नाही.

दुसरे असे की महाराष्ट्रातच राहून मातृभाषेत शिक्षण मिळवायची इच्छा बाळगण्यात किंवा त्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात काय गैर आहे? माझ्या वरील दुसऱ्या प्रतिसादात विशेष करून महाराष्ट्रात राहून घेतल्या ज़ाणाऱ्या शिक्षणाबद्दल मत मांडले आहे. त्यामुळे त्या प्रतिसादात तामिळनाडू, जपान यांसारख्या प्रांतात तेथील प्रादेशिक किंवा जागतिक संवादभाषा सोडून तुमच्या मातृभाषेत शिक्षण मिळणे किती दुरापास्त आहे, याबद्दलची कल्पना अध्याहृतच आहे. गंमत म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा सापडायच्या नाहीत, पण महाराष्ट्रात मात्र विविध माध्यमांमधून शिक्षण (कानडी, बंगाली इत्यादी) देणाऱ्या अनेक शाळा सापडतील. याला महाराष्ट्राचा सहिष्णुभाव किंवा अठरापगड ज़ातीधर्मांच्या, संस्कृतीच्या नि बहुभाषक लोकांचे अस्तित्त्वाचा प्रभाव म्हणावे की मराठी भाषेची अविकसितता?

बाकी, प्रतिशब्द सुचवताना पाळावयाच्या बऱ्याचशा (ज़वळज़वळ सगळ्या) पथ्यांशी सहमत आहे.