महाराष्ट्रात भाषा शिक्षणाचा दर्जा अत्यंत हलका आहे !
हिंदी आणि इंग्रजीचे उत्तम ज्ञान नसल्याने मराठीभाषक सैन्यात व इतर केंद्र सरकारी नोकऱ्यांमध्ये अत्यल्प दिसतात. मुंबईत अशा कुठल्याही कार्यालयात जाऊन बघावे. अनेक मल्याळी दिसतील. त्याच कार्यालयाच्या त्रिवेंद्रम शाखेत एकही मराठी सापडणार नाही. दूरचित्रवाणीवर बंगाली किंवा दक्षिण भारतीय सापडतील पण एकही मराठी निवेदक इंग्रजी किंवा हिंदीत निवेदन करताना आढळणार नाही. असे का होते?
मराठी वर्तमानपत्रातील प्रत्येक जाहिरातीत व्याकरणाच्या व शुद्धलेखनाच्या एक-दोन चुका हटकून मिळतात. सरकारी कार्यालयात, अस्सल मराठी म्हणवण्याऱ्या बॅक ऑफ़ महाराष्ट्र किंवा सारस्वत बॅकेत उभ्या केलेल्या भित्तिफलकावर अगणित चुका सापडतात. पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या तसेच देहूच्या तुकाराममंदिराच्या प्रवेश कमानींवर मोठ्ठ्या अक्षरात महाव्दार असे रंगवले आहे. श्रद्धा, द्वारका, उज्ज्वल अनसूया, अहल्या हे शब्द हे शब्द बरोबर लिहिलेले पाहण्याची आशा आता सोडून दिलेली बरी. उत्तरांचलापासून बिहार-सिक्कीम-मध्यप्रदेशात कुठेही पहा, फलकांवर अशुद्ध हिंदी अभावानेच दिसते. पुण्यात रस्त्यारस्त्यांवर 'वहाणे हाळु चालवा' वाचावे लागते. दुध्ध्, तुप्प्, गुळ्ळ्, Tution, कोल्ड्रींSक, coatuss, shirtuss, sweetuss, aiduss,Taaimuss अशा उच्चाराच्या मराठी पाट्या जागोजाग दिसतील. महाराष्ट्रात भाषाशिक्षणाचा दर्जा खालचा आहे हे अनुभवण्यास अजून कोणते पुरावे द्यावेत?
माधवराव कुलकर्ण्यांचे मराठी उत्तम आहे हे सर्व जाणतात, मुद्दाम आवर्जून सांगायची गरज नाही. इंग्रजीसुद्धा चांगले असणार. त्यांचे हिंदी उत्तम असेल तर त्यांनी वर्तमानपत्रातील एखाद्या इंग्रजी लेखाचे हिंदी भाषांतर करून पहावे, मनासारखे जमले तर हिंदी चांगले, अन्यथा शिकायला अजून वाव आहे असे समजावे. संस्कृतात पाणिनीच्या अष्टाध्यायीवर, किंवा छंदशास्त्र-निघंटु-निरुक्त-यज्ञशास्त्रांवर बाजारात सहजरीत्या मिळणारे हिंदी टीकाग्रंथ आहेत. मराठी पुस्तके नसल्यात जमा आहेत; असलीच तर दुर्मीळ झाली आहेत. ही हिंदी पुस्तके काशी, प्रयाग, गया येथील विद्वांनांनी लिहिलेली. त्यातली भाषा समजेना म्हणून संस्कृत प्राध्यापकांना विचारायला गेल्यावर त्यांनी काय म्हणावे? याच विषयांवर जर्मन टीकाग्रंथ आहेत. पंधरा दिवसात थोडेसे जर्मन शिका आणि खुशाल वाचायला लागा. जर्मन ग्रंथांची भाषा अतिशय सोपी आहे, सहज समजेल. माझे हिंदीचे ज्ञान किती अपुरे आहे हे मला तेव्हा कळाले.
। दुसरीकडे 'शुद्ध मराठी' हे स्वतःचे शिक्षण महाराष्ट्रात न झाल्याचे कबूल करत आहेत-
। हा विरोधाभास पचनी पडणे जरा अशक्य आहे.
मी ज्यावर्षी मॅट्रिक झालो त्यावेळी ७०० मार्कांची परीक्षा होती. इंग्रजी सक्तीचे-चार पेपर. १)गद्य-पद्य-व्याकरण, २)स्थूलवाचन अधिक व्याकरण ३) व्याकरण-निबंध-सारांश-वृत्तलेखन . चौथा २५ गुणांचा मराठी निबंधाचा. दुसरा आणि चौथा पेपर हिंदी, मराठी, गुजराथी किंवा बंगाली भाषेत लिहिता यायचा. आमच्या गावात खूप बंगाली निर्वासित आले होते. त्यामुळे शाळेत बंगाली शिकवले जायचे. पाचवा पेपर भूमिती-त्रिकोणमिती- याला मराठी किंवा हिंदी-बंगाली भाषांचा विकल्प होता. सहावा बीजगणित(विकल्प -संगीत किंवा चित्रकला), सातवा-आठवा इतिहास-भूगोल(१२० गुणांचा भूगोल व तीस गुणांचा इतिहास किंवा उलट). इतिहासभूगोलाऐवजी नागरिकशास्त्र, शरीरशास्त्र व आरोग्यशास्त्र घेता यायचे. मुली बहुधा हे व संगीत-नृत्य-चित्रकला-शिवण असे विषय घेत. नववा संस्कृत. दहावा भारतीय संस्कृती. यात संस्कृत व इतर ग्रंथांची ओळख करून देत व भगवद्गीता, सदाचार-नीतिनियम इत्यादी शिकवत. या विषयावरचे पुस्तक मराठी, पण अत्यंत गचाळ हिंदी लिपीत छापलेले होते. आमचे शालेय भाषाशिक्षण हे असे होते! पाश्चात्त्य व मध्यपूर्वीय भाषांचे शिक्षण एक-दोन वर्षांअगोदर बंद झाले होते.
या सुमाराला महाराष्ट्रात काय परिस्थिती होती? महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री बाळासाहेब खेर मुलांवर प्रयोग करीत होते. इंग्रजांनी स्वतःच्या सोयीसाठी मुलांवर 'लादलेली' उन्हाळ्याची सुट्टी रद्द करून शाळा सुरू ठेवल्या होत्या. वार्षिक परीक्षा न घेता सर्व विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात चढवले होते. मुंबई विद्यापीठाकडून मॅट्रिकची परीक्षा काढून घेऊन ती एस्एस्सी नावाच्या 'बोर्डा'कडे सोपवली होती. इंग्रजी-गणित न घेता परीक्षा देता येऊ लागली होती. इंग्रजी व्याकरण कमी करून गद्य-पद्याचा पेपर सुरू केला होता. पुढे मोरारजीभाई देसायांनी इंग्रजी आठवीपासून करून विद्यार्थ्यांची एक पिढी बरबाद केली. पानिपतानंतर महाराष्ट्रावर कोसळलेली ही दुसरी भीषण आपत्ती. शाळेतून एन्सीसी बंद. शनवारवाड्यावरचा नामदेवराव गायकवाडांचा रोज पहाटे वाजणारा चौघडा थांबवला. आणि इतर अनेक. ह्या धक्क्यांतून महाराष्ट्र अजून सावरलेला नाही. शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावतो आहे.
सीबीएस्सी(सेंट्रल बोर्ड)ला मराठी नाही असे माधवरावांना कुणी सांगितले? कुठलाही विद्यार्थी या पराक्षेसाठी मराठी घेऊ शकतो, महाराष्ट्राच्या बाहेरचासुद्धा. यंदाच्या वर्षी श्यामची आई हे पुस्तक नेमलेले आहे. महाराष्ट्राचा एस्एस्सीचा दर्जा सीबीएस्सीच्या पासंगालापण पुरणार नाही!!