त्याचं काय आहे, कोणी कोणते कपडे घालावेत म्हणजे ते चांगलं किंवा सुसंस्कृततेचं किंवा कुलीनतेचं लक्षण वगैरे सगळे मुद्दे हे सापेक्ष आहेत.

चिं. वि. जोश्यांच्या कुठल्याशा पुस्तकातला प्रसंग आहे, खूप पूर्वी वाचलाय, नेमका संदर्भ (आणि नेमके तपशीलसुद्धा) आठवत नाही. पण काहीसा असा:

चिमणरावांच्याच आप्तेष्टांपैकी एक स्त्री (नेमकी कोण ते आठवत नाही), आदिवासी स्त्रीजीवनाचा अभ्यास करण्यासाठी काही आदिवासी स्त्रियांना भेटते, आणि टिपिकल शहरी शहाणपणाने त्या स्त्रियांना चोळी कशी घातली पाहिजे, चोळी घालणं हे कसं सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे, वगैरे समजावून सांगू लागते. काही उपयोग होत नाही. (नक्की आठवत नाही, पण बहुधा 'त्या तुमच्या शहरातल्या पद्धती, आमची पद्धत ही अशीच आहे' वगैरे काउंटरआर्ग्युमेंटं येतात.) शेवटी निर्वाणीचा उपाय म्हणून 'अहो पण चोळी घालणं ही एक चांगली प्रथा आहे, म्हणून तरी घ्या ना' हे आर्ग्युमेंट फेकलं जातं. त्याला प्रत्युत्तर: 'अहो, ह्याटी घालणं हीही एक चांगलीच पद्धत आहे, पण म्हणून जर मडमा म्हणाल्या की आम्ही घालतो, तुम्ही पण घाला, तर तुम्ही घालाल काय? मग आम्हालाच का शिकवता?'

थोडक्यात, आपल्यासाठी योग्य कपडे कुठले, हे ज्यानं त्यानं ठरवावं. दुसऱ्यानं आपली मतं लादू नयेत. (किंवा दुसऱ्यांना त्याबद्दल मतं असण्याचंही कारण नसावं.)

भारतीय संस्कृतीचं म्हणाल, तर ही काय दगडात कोरलेली गोष्ट नाही. प्रत्येकाची भारतीय संस्कृती वेगळी. ज्याला जशी दिसेल, त्यानं ती तशी पाळावी. दुसऱ्याला ती कशी दिसावी किंवा दुसऱ्यानं ती कशी पाळावी यात नाक खुपसू नये. (चोळी न घालणाऱ्या आदिवासी जमातींतील स्त्रिया या पाश्चात्य संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात, असं वाटत नाही. त्याही भारतीयच, आणि त्यांची ती भारतीय संस्कृती. आपली भारतीय संस्कृती त्यांच्या भारतीय संस्कृतीवर लादू नये.

आणि एखाद्या भारतीय स्त्रीने जर जीन्स - किंवा अगदी शॉर्ट्सही - घातल्या, तर त्याक्षणी स्त्रियांनी जीन्स - किंवा शॉर्ट्स - घालणं हाही भारतीय संस्कृतीचाच भाग झाला. त्यालाही कोणी नाकं मुरडण्याचं कारण नसावं.

दुर्दैवानं प्रत्यक्षात 'भारतीय संस्कृती' हे केवळ भारतीयांनी भारतीयांनाच झोडपण्याचं एक साधन झालेलं आहे.)